|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सज्जनगडावर दासनवमी उत्सव मोठय़ा थाटात साजरा

सज्जनगडावर दासनवमी उत्सव मोठय़ा थाटात साजरा 

प्रतिनिधी/ सातारा

श्री रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ या दोन्ही संस्थांनी 335 वा दासनवमी उत्सव समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या सज्जनगड येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. दहा दिवस चालणाऱया महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतातून नामवंत कलाकारांनी आपली कला महोत्सवात सादर केली. 

 स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद जिल्हय़ातील तेर, मिरज येथून वेण्णास्वामी, कल्याण स्वामी यांची पालखी, समर्थांचे जन्मस्थळ असलेल्या जांब येथून शेकडो समर्थ भक्तांसह पायी दिंडय़ा सज्जनगडावर आल्या होत्या. 

 दासनवमी निमित्त काकड आरती, स्वामींच्या समाधीस स्वामींचे वंशज, अध्यक्ष अभिराम अयोध्यानाथ स्वामी यांचे हस्ते महाभिषेक करण्यात आला. तसेच छत्र, चामर, दंड, आबदागिर्या, शिंग तुतार्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला होता. यावेळी रामायण वाचन करण्यात आले.

त्याचबरोबर क्लोज सर्किट टिव्हीच्या माध्यमातून भाविकांना महापूजेचे दर्शन घडविण्यात आले होते. तसेच रामभक्त हनुमान आणि शिवसमर्थाची भेट व समर्थानी  शिवरायांना दाखवलेला दगडातील जीवंत बेडकीचा दाखला, असे समर्थांचे उभारलेले भव्य पुतळे विशेष आकर्षण ठरत होते. आठवडा भर चालेल्या सामुदायिक दासबोध वाचनाची सांगता नितीन बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांनी केली.

महावितरण-आगाराचे सहकार्य

सामाजिक सेवा संस्थांचे स्वयंसेवक व अनिरूध्द बापू डिझॅस्टर मॅनेजमेंट ग्रुपचे सदस्य यांनी गर्दी नियंत्रणासाठी काम पाहिले. टेलिफोन सुविधा व वीज वितरण कंपनीने कोणतेही भारनियमन न करता गडावर अखंड लाईट पुरविली. भाविकांसाठी सातारा आगारातून जादा बसेसची सोय करण्यात आली होती. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त

उत्सवास दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 75 पोलीस कर्मचारी व 2 बिनतारी संदेश यंत्रणेची वाहने तैनात करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्फे आरोग्य पथके उभारण्यात आली होती.

 दासनवमीची सांगता आज मंगळवार 21 रोजी किर्तनाने होणार आहे. या उत्सवात राज्यातून लाखो भाविक आले होते, असे अध्यक्ष अभिराम स्वामी यांनी सांगितले.

Related posts: