|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऐन काजू हंगामात धुक्याचे सावट

ऐन काजू हंगामात धुक्याचे सावट 

नारायण गांवस / पणजी

 गोव्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा व्यवसाय व गोव्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीही काजूंना चांगला बहर आला आहे. पण मागील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात  पडलेल्या धुक्यामुळे हा बहर काळसर झाल्याने शेतकरी  चिंताग्रस्त झाले आहेत. काजू झाडावरील असलेला बहर पाहता यावर्षीही समाधानकारक काजू पीक शेतकऱयांना मिळण्याची आशा शेतकरी अधिकाऱयांकडून वर्तविली जात आहे.

 गोव्यातील सत्तरी, पेडणे, डिचोली, काणकोण अशा बहुतेक तालुक्यांमध्ये काजू पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. गावठी काजूपेक्षा आता कलमी काजूवर लोकांनी जास्त भर दिला आहे. यावर्षी सुरुवातीला काजू कलमांना चांगला बहर आला होता काही ठिकाणी काजू कलमे लागायला सुरुवात झाली आहे. पण गेल्या आठवडय़ात  पडलेल्या धुक्यामुळे काजूचा बहर जळला आहे त्यामुळे काजू पीक घटणार, अशी चिंता शेतकरी वर्गामध्ये वर्तविली जात आहे. धुक्यामुळे काजू पिकावर मोठय़ा प्रमाणात परिणाम जाणवतो. मार्च महिन्यापासूनच काजू हंगामला सुरुवात होत असते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये काजू झाडांना बहर येत असतो. पण या महिन्यामध्ये वातावरणात बदल होत असल्याने त्यांचा परिणाम या काजू पिकांवर जाणवतो. अजूनही रात्रीची थंडी पडत असल्याने काजू पिकावर त्याचा परिणाम होत आहे.

कलमी काजू चांगला

 राज्यात कलमी काजूची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. कमी काळातही शेतकऱयांन हे पीक घेता येत असल्याने बहुतेक लोकांनी आपल्या शेतजमिनीमध्ये कलमी काजूची लागवड केली आहे. कलमी काजूना आयुष्य कमी असले तरी त्यांची  लागवड चांगली असते. पावसाळय़ात कृषी खात्याकडून देण्यात येणारे खत घातल्यावर या कलमी काजूची लागवड चांगली होते. गोव्यात जास्तीत जात शेतकरी हे कलमी काजूची लागवड करत आहेत.

गावठी काजू

 गोव्यात अजूनही मोठय़ा प्रमाणात गावठी काजू आहेत. सत्तरी काणकोण सारख्या डेंगराळ भागातील तालुक्यामध्ये गावठी काजूचे पीक जास्त आहे. गावठी काजू पीक  एप्रिल व मे महिन्यात जास्त प्रमाणात मिळते या काजूची लागवड उशिरा होत असल्याने आता पडणाऱया धुक्याचा या पिकावर तेवढा परिणाम होत नाही. तसेच हंगामी दारुभट्ठीसाठी गावठी काजू बोंडाना चांगली मागणी आहे. कलमी काजूच्या बोंडाचाही वापर दारुभट्टीवर केला जातो पण गावठी काजू बोंडाना जास्त रस असल्याने या बोंडाना खूप मागणी आहे. सरकारच्या वनखात्याचे डोंगरातील काजू बागायतींची पावणीच्या आधारे बोलणी करुन घेतली जाते. गोव्यात अंजुणे धरण परिसर तसेच अन्य विविध ठिकाणी डोंगराळ भागात असलेल्या या काजू वनखात्याकडून लोक करायला घेतात. हे गावठी काजू अजूनही गोव्यात मोठय़ा प्रमाणात आहे.

गोव्याच्या काजूना जगभरात मागणी

 गोव्याच्या काजूना जगभरात मोठी मागणी आहे. गोव्याचे उष्ण वातावरण हे काजू पिकासाठी लाभदायक असल्याने मोठय़ा प्रमाणात काजू पीक गोव्यात घेतले जाते. गोव्यातील काजू पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच इतर राज्याप्रमाणे विदेशातील या काजूंची निर्यात केली जाते. गोव्यात सगळय़ा शहरामध्ये काजूची दुकाने आम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे काजू पिकाला गोव्यात जास्त मागणी आहे.

काजू पीक समाधानकारक असणारः कृषी संचालक

 जरी यंदा काजू हंगामाच्या सुरुवातीला धुके पडल्याने काजू हंगामावर परिणाम जाणवला असला तरी यावर्षी वर्षपद्धप्रमाणे काजू पीक समाधानकारक असणार आहे. शेतकऱयांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. तसेच यंदा काजूच्या किंमतीही स्थिर राहणार आहेत. 140 ते 160 प्रतीकिलो  या  दरातच काजू दर राहणार आहे, असे कृषी खात्याचे संचालक उल्लास पै काकोडे यांनी सांगितले.

धुक्यामुळे नुकसानः काजू उत्पादक

 या वर्षी सुरुवातीला काजूला मोठय़ा प्रमाणात बहर आला होता. पण मागील आठवडय़ात पडलेल्या धुक्यामुळे काजूचा बहर काळसर पडला आहे. ऐन काजूच्या हंगामातच पडलेल्या या धुक्यामुळे तोंडघशी आलेले पीक वाया गेलेले आहे. काजूला प्रतीकिलोला चांगला दर मिळत असल्याने काही प्रमाणात शेतकऱयांना लाभ होणार आहे, असे काजू उत्पादक विष्णू गावकर यांनी सांगितले.

Related posts: