|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » न्यायालयाबाहेरील स्फोटात पाकिस्तानमध्ये 7 ठार

न्यायालयाबाहेरील स्फोटात पाकिस्तानमध्ये 7 ठार 

पेशावर / वृत्तसंस्था

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतात मंगळवारी न्यायालयाबाहेर झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान 7 जणांचा बळी गेला असून 14 जण जखमी झाले आहेत. या प्रांतातील सत्र न्यायालयाबाहेर ही घटना घडली आहे. सत्र न्यायालयाच्या आवारात दाखल होण्याच्या प्रयत्नात असलेल्या हल्लेखोरांना सुरक्षा जवानांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी सुरुवातील अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर हातगोळय़ांचा स्फोट घडवून आणला. सुरक्षा दलाने यावेळी केलेल्या कारवाईत तिघा हल्लेखोरांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी तालिबानी गट जमात-उल-अहरर (जेयूए) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

एकाच वेळी अनेक दहशतवाद्यांनी हल्ला चढवत न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोळाबारीला सुरुवात केल्याचे पोलीसांनी सांगितले. या हल्यात एकूण 7 नागरिक ठार झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख सोहेल खलीद यांनी सांगितले. हल्लेखोर न्यायालयाच्या मुख्य इमारतीपर्यंत न पोहोचल्याने सर्व न्यायाधीश आणि वकील सुरक्षित राहिल्याचे सांगण्यात आले. जखमींना उपचारासाठी पेशावर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुरुवारी सिंध प्रांतातील सुफी-दर्ग्यावर झालेल्या भीषण हल्ल्यात 88 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्थेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दर्ग्यावरील हल्ल्यानंतर लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा पाक लष्कराने केला आहे.

Related posts: