|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » हरिकाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी

हरिकाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी 

वृत्तसंस्था/ तेहरान

भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली असून तिने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात शानदार विजय मिळवित आघाडी घेतली आहे. आता दुसरा डाव बरोबरीत सोडविण्याची तिला गरज आहे.

हरिकाने जॉर्जियाच्या नॅना झॅग्नाईझचा पहिल्या डावात पराभव करीत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिने परतीचा डाव अनिर्णीत राखल्यास उपांत्य फेरीतील तिचे स्थान निश्चित होणार आहे. अन्य सामन्यात युक्रेनच्या द्वितीय मानांकित ऍना म्युझीच्युकने माजी विजेत्या बल्गेरियाच्या ऍन्टोनेटा स्टीफानोव्हावर विजय मिळविला. माजी विजेती रशियाची अलेक्झांड्रा कोस्टेनियुक व चीनची नि शिकुन यांच्यातील पहिला डाव अनिर्णीत राहिला तर चीनच्या टॅन झाँगयी व अग्रमानांकित जु वेनजुन यांचा डावही बरोबरीत सुटला. हरिकाप्रमाणे म्युझीच्युकलाही परतीचा डाव बरोबरीत ठेवण्याची गरज आहे. रेटिंगनुसार फेव्हरिट असणाऱया वेनजुन, कोस्टेनियुक यांना मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी परतीच्या डावात विजय मिळविणे आवश्यक ठरणार आहे. दोघींना परतीच्या डावात पांढऱया मोहरांनी खेळावे लागणार आहे.

पेंच डिफेन्सच्या डावात हरिकाला डावाच्या मध्यावर किंचित ऍडव्हांटेज मिळाला होता. दोघींचा खेळही व्यवस्थित चालला होता. पण 39 व्या चालीत झॅग्नाईज हरिकाच्या जाळय़ात अडकली. डाव अनिर्णीत राखण्याच्या व्हेरिएशन्स तिच्या लक्षातच आल्या नाहीत. वेळ संपत आल्याने हरिकाच्या वजिराला तिने आक्रमण करण्याची संधी दिली. हरिकाने तिचा वजीर जिंकल्यानंतर 47 व्या चालीत डावही संपविला. परतीच्या डावात हरिकाला काळय़ा मोहरा मिळणार आहेत. त्यामुळे तिला सावध व संयमी खेळ करावा लागणार आहे. झॅग्नाईझला मात्र बरोबरीसाठी विजय मिळविणे आवश्यक असल्याने तसे प्रयत्न तिच्याकडून होणार आहेत. हरिकाला गेल्या दोन वर्ल्ड चॅम्पियनशिमध्येही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते आणि तिने उपांत्य फेरीही गाठली होती.

Related posts: