|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बूम बूम आफ्रिदी

बूम बूम आफ्रिदी 

पाकिस्तानपेक्षाही भारतात मला चाहत्यांचे अधिक प्रेम लाभते, असे सांगणारा शाहिद आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि एका दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीची, दोन दशकांच्या एका पर्वाची शांतपणाने सांगता झाली. साधारणपणे 21 वर्षांपूर्वी जेमतेम 16 वर्षांचा, चेहऱयावर तेज असलेला हा गुणवान फलंदाज, अष्टपैलू खेळाडू नैरोबीतील जिमखाना क्लब ग्राऊंडवर उतरला आणि पाकिस्तानसाठी पुढील दोन दशके त्याने अनेकदा अपेक्षा उंचावल्या. काही वेळा अपेक्षापूर्ती केली तर अनेकदा अपेक्षाभंगही केला. अर्थात, तमाम जागतिक क्रिकेट वर्तुळाला त्याच्या खेळाची, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी होती, हे सर्व देशाधर्माची बंधने पार करून मान्य करायला हवे. आफ्रिदी असेपर्यंत पाकिस्तानी संघाला विजयाची आस असायची तर प्रतिस्पर्ध्यांना कधी एकदा या दिग्गजाला तंबूत पाठवून आपण सुटकेचा निःश्वास टाकतो, याची प्रतीक्षा असायची. एकदा सूर सापडला तर या दिग्गज फलंदाजाला रोखणे कर्मकठीण, याची जाणीव अवघ्या क्रिकेट जगताला होती आणि म्हणूनच आफ्रिदीची विकेट अतिशय हुकमी मानली गेली. सचिन तेंडुलकरला बाद करण्यासाठी जशी प्रतिस्पर्धी गोलंदाजांमध्ये स्पर्धा लागायची, ती आफ्रिदीच्या वाटय़ाला जरूर आली नसेल. पण, तरीही अचानक उसळून येणारी त्याची आक्रमकता, त्याची तडफ अर्थातच सर्वांना हुरहूर लावून जायची. मुळात, मागील 5 ते 8 वर्षांत जागतिक क्रिकेटचा प्रवास पाहता, त्यात सर्वाधिक कोणत्या देशाचे नुकसान झाले असेल तर ते पाकिस्तानचे आणि या कालावधीत त्या देशाच्या अनेक क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचेही तीन-तेरा वाजले, हे ओघानेच आले. त्यात आफ्रिदीचा प्रामुख्याने समावेश राहिला. त्याची कारकीर्द जरा कुठे बहरत असताना लाहोरमध्ये लंकन संघावर जीवघेणा हल्ला झाला आणि पाकिस्तानमधील अंतर्गत क्रिकेटच जवळपास पूर्ण ठप्प झाले. सुक्याबरोबर ओले देखील कसे जळते, हे त्यावेळी समकालीन पाकिस्तानी क्रिकेट पिढीने याची देही याचि डोळा अनुभवले आणि त्या निकषावर आफ्रिदीसारखे काही दिग्गज खेळाडू देखील त्यात भरडले गेले. अवघ्या 40 चेंडूत 102 धावांची आतषबाजी करणारा हा दिग्गज खेळाडू पाकिस्तानसाठी आशास्थान राहिला. पण, पीसीबीचे पराकोटीचे राजकारण, एकमेकांवर कुरघोडी करण्याची कूपमंडूक प्रवृत्ती आणि सर्वत्र प्रकर्षाने हजर असणारा स्वार्थ, यामुळे आफ्रिदीला देखील त्याचाच हर-एक वळणावर फटकाच बसत राहिला. त्याची फलंदाजी बेदरकार असायची आणि कोणताही चेंडू थेट स्टेडियमबाहेर भिरकावून टाकण्याची त्याची लाजवाब क्षमता निव्वळ वाखाणण्याजोगी राहिली. तरीही, याच बेदरकार फलंदाजीच्या नादात कित्येकदा तो विकेट्स फेकत राहिला आणि पीसीबीदेखील आज नाही तर उद्या खेळेल, या अपेक्षेत त्याला खेळवत राहिली. त्याचा आत्मविश्वास मात्र निव्वळ बुलंद स्वरुपाचा. समोर येणारा चेंडू केवळ थोपवण्यावर त्याचा अजिबात विश्वास नसायचा. उलटपक्षी, तो चेंडू सीमापार कसा पिटाळता येईल, हा त्याचा प्राधान्यक्रम असायचा. म्हणूनच जागतिक स्तरावरील एकापेक्षा एक सरस गोलंदाजांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीची एक दहशत निर्माण करून ठेवली होती. फलंदाजीच्या साथीने तितक्याच तोलामोलाची त्याची लेग स्पिन गोलंदाजीदेखील पाकिस्तानी संघासाठी आणखी एक सक्षम पर्याय म्हणून समोर आली. एक वेळ तर अशी आली की, ज्यावेळी आफ्रिदी फलंदाजापेक्षाही गोलंदाज म्हणून अधिक नावारूपास आला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ब्रायन लारा यांची फलंदाजी नजाकतदार मानली तर आफ्रिदीची फलंदाजी बरीचशी रंजक असायची. 2009 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य व श्रीलंकेविरुद्ध अंतिम लढतीतील त्याचे सलग दोन अर्धशतकी डाव तर पाकिस्तानसाठी स्पर्धा जिंकून देणारे ठरले. अर्थात, नेतृत्वाचे ओझे त्यालाही फारसे झेपले नाही. ‘एक खेळाडू म्हणून मी सक्षम आहे. पण, एक कर्णधार म्हणून मी स्वतःला फारसा फिट मानत नाही’, हे त्याचे 2016 टी-20 विश्वचषकात मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीनंतरचे वाक्य याबाबतीत खूप काही सांगून जाणारे ठरले. त्याच स्पर्धेत त्याने पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, असे जाहीरपणे सांगितले. पुढे काश्मिरी चाहत्यांचे आभार मानल्याचे निमित्त झाल्यानंतर तर पाकिस्तानमध्ये फक्त आगडोंब उसळणे बाकी राहिले होते. आता राहिली बाब पुन्हा आफ्रिदी पाकिस्तानकडून खेळणार का, तर याचे उत्तर भविष्यातच मिळेल. मुळात, पाकिस्तानातील क्रिकेटच्या दिशा प्रत्यक्ष खेळातील अनिश्चिततेपेक्षाही आणखी जटिल ठरतात. तिथे कोणता खेळाडू कधी निवृत्ती स्वीकारेल आणि कधी पुन्हा मैदानात दाखल हजर होईल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.  या 10 वर्षांच्या कालावधीत स्वतः आफ्रिदीनेच एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 4 वेळा निवृत्ती जाहीर केली आहे, हे देखील लक्षवेधी. सर्वप्रथम 2006 मध्ये तो कसोटीतून निवृत्त झाला आणि लगोलग त्याने ती निवृत्ती मागेही घेतली. 2011 मध्ये त्याने घेतलेली निवृत्ती तर काही महिन्यांपुरतीच टिकली. अगदी 2015 वनडे विश्वचषकानंतरही त्याने निवृत्ती घेतली आणि कालांतराने स्वतःच रद्दबातल ठरवली. हा निर्णय त्याने 2016 टी-20 विश्वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवून घेतला होता. अर्थात, ही स्पर्धा देखील त्याच्यासाठी फारशी यशदायी ठरली नाही. उलटपक्षी, अनेक वादांना त्याने  जाहीरपणे निमंत्रण दिले. काही वेळा तर त्याने कर्णधार या नात्याने पत्रकार परिषदांना येणेही टाळले. पुढे हा संघ मायदेशी पोहोचला आणि पाकिस्तानात पाकिस्तानी क्रिकेटपटूही ‘सुरक्षित’ असत नाहीत, याचा अनुभवही त्याला आला. भारतात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला मायदेशात बरीच टीका झेलावी लागली. सचिन-विराटला पाकिस्तानात जितकी लोकप्रियता लाभली, तितकी आफ्रिदीला भारतात लाभणे निव्वळ अशक्य. पण, तरीही, पाकचा ‘लाला’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या हरहुन्नरी खेळाडूने जागतिक क्रिकेटमध्ये खेळाला एक उंची प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला, हे तितकेच खरे.

 

Related posts: