|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सराफी दुकानातून कामगाराने चोरले 645 ग्रॅमचे दागिने

सराफी दुकानातून कामगाराने चोरले 645 ग्रॅमचे दागिने 

प्रतिनिधी / बेळगाव

गणपत गल्ली येथील एका सराफी दुकानात काम करणाऱया कामगाराने दुकानातील 645 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी सीसीबी व खडेबाजार पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे.

प्रशांत महाबळेश्वर दैवज्ञ (वय 34, रा. शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी प्रशांतला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी प्रशांतला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार प्रशांत हा 20 जुलै 2016 पासून गणपत गल्ली येथील एका सराफी दुकानात काम करत होता. या दुकानातून त्याने टप्प्याटप्प्याने 645 ग्रॅमचे दागिने पळविले होते. हा प्रकार उघडकीस येताच मंदार सदानंद मुतगेकर यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 19 फेब्रुवारी रोजी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले होते.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी प्रशांत दैवज्ञ या युवकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. टप्प्याटप्प्याने त्याने सराफी दुकानातून दागिने लांबविल्याचे उघडकीस आले असून प्रशांत विरुद्ध भा.दं.वि. 381 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत हा सेल्समन म्हणून कामाला होता. सराफी दुकानाचे मालक व इतर कर्मचाऱयांची नजर चुकवून त्याने दागिने पळविले होते. सहा महिन्यांत त्याने 645 ग्रॅम इतके सोन्याचे दागिने लांबविले आहेत. बुधवारी प्रशांतला न्यायालयासमोर हजर करून या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले असून चोरीचे दागिने त्याने कोठे ठेवले आहेत? याची चौकशी सुरू आहे.