|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौर निवड बैठकांना ऊत

महापौर निवड बैठकांना ऊत 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या सर्वच गटात बैठकांना ऊत आला आहे. सायंकाळी उशिरा मराठी भाषिक 32 नगरसेवकांची बैठक एका गुप्तस्थळी आयोजित करून आपल्यातील अंतर्गत वाद मिटवून एकी करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी गटातील दुफळीचा फायदा घेऊन सत्ता मिळविण्यासाठी आता कन्नड-उर्दू गटातील नगरसेवकांची बैठक झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी सत्ताधारी गटातील इच्छुकांना अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी कोणीच प्रतिसाद दिला नाही. मात्र बुधवारी दिवसभर बेळगाव विकास आघाडी, समविचारी आघाडी आणि कन्नड उर्दू गटातील नगरसेवकांच्या विविध ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. मराठी गटातील दुफळीचा फायदा घेऊन महापालिकेत सत्ता कोणत्या पद्धतीने प्रस्थापित करता येईल, याची व्यूहरचना बैठकीत रचण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव विकास आघाडीतील नाराज नगरसेवकांसह सर्वांची बैठक एका गुप्तस्थळी आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीला समविचारी आघाडीतील नगरसेवकांनी पाठ फिरविली होती. फक्त नगरसेवक मोहन बेळगुंदकर एकटेच बैठकीला उपस्थित होते. यामुळे निवडणुकीबाबत ठोस चर्चा झाली नसल्याचे समजते. मात्र मराठी भाषिकांमधून महापौर-उपमहापौर निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीला उपस्थित राहण्यासाठी समविचारी गटातील दहा नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. बेळगाव विकास आघाडीचे  सचिव अनंत देशपांडे यांनी विनायक गुंजटकर यांच्याशी चर्चा करून बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना केली होती. याबाबत 22 नगरसेवक आणि 10 जणांमधून काही जणांची बैठक घेऊन चर्चा करून तोडगा काढू, असे विनायक गुंजटकर यांनी अनंत देशपांडे यांना कळविले होते. अंतर्गत वाद मिटवून तोडगा काढण्यासाठी 22 नगरसेवकांमधून पाच जणांची समिती करण्यात आली आहे. गटनेते पंढरी परब, सचिव अनंत देशपांडे, ऍड. रतन मासेकर, माजी महापौर किरण सायनाक, विजय पाटील आदींची समिती स्थापन करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषिक नगरसेवकांमधील अंतर्गत वाद मिटवून एकत्रित निवड प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.