|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपईत जमले दोन हजार शिवप्रेमी

वाळपईत जमले दोन हजार शिवप्रेमी 

प्रतिनिधी /वाळपई :

वाळपई शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात येणार आहे, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याच्या गैरसमजुतीने काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुमारे दोन हजारांच्यावर शिवप्रेमी शिवाजी चौकात जमले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याचा प्रयत्न झाल्यास गोवा तसेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी वाळपईत येऊन प्रतिकार करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 संपूर्ण गोव्यातून जमले शिवप्रेमी

यासंबंधिची माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी वाळपई शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस दाखल झाल्याची वार्ता वाऱयासारखी सर्वत्र पसरली. वाळपईतील शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचे प्रकरण ताजे असल्याने सदर पुतळा हटविण्यासाठीच पोलीस तैनात केल्याच्या गैरसमजुतीने सत्तरीच्या विविध भागातील शिवप्रेमी तसेच फोंडा, म्हार्दोळ, म्हापसा, पणजी, डिचोली, पेडणे, मडगाव, वास्को आदी भागातील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त शिवप्रेमींनी गर्दी करुन शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ाला गराडा घातला. कोणत्याही परिस्थितीत पुतळ्य़ाला हात लावू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, वाळपईचे मामलेदार राजेश आजगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला.

Related posts: