|Saturday, January 25, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पुढे काय?

पुढे काय? 

महाराष्ट्रातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागले. आता पुढे काय असा प्रश्न सर्व जनतेच्या मनात आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षांना 82 आणि 84 अशा जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यापासून दोन्ही पक्ष जवळपास सारख्याच अंतरावर उभे आहेत. पण या दोहोंच्या स्थितीत बरेच अंतर आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे चाळीस आणि मनसेकडे सात जागा आहेत. हे पक्ष शिवसेनेपेक्षा भाजपच्या अधिक विरोधात आहेत. मनसेने तर निवडणुकीपूर्वीच युती करण्याचा प्रस्ताव स्वतःहून सेनेला दिला होता. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मुंबईत सेनाच वरचढ ठरेल असे वारंवार म्हटले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पाडावे अशी वारंवार विनंती त्यांनी सेनेला केली होती. म्हणजे भाजपविरोधात कृती करण्यास ते उत्सुक आहेत. निदान तेव्हा तरी होते. देशपातळीवरच्या राजकारणाचा विचार करता काँग्रेस कोणत्याही स्थितीत सेना वा भाजपसोबत जाऊ शकत नाही. मात्र ते तटस्थ राहून सेनेला मदत करू शकतात. या सर्व गोष्टी जमून आल्या तर मुंबईत शिवसेना सत्तेत येऊ शकेल. परंतु ते सहजासहजी घडेल असे नव्हे. शिवाय अशी येणारी सत्ता कितपत स्थिर राहील हाही प्रश्न असेल. त्या सत्तेची किंमत कोणाच्या खिशातून भरली जाईल याचाही विचार करावा लागेल. दुसरीकडे भाजपला मनसे, अपक्ष व राष्ट्रवादी यांची मदत मिळू शकली असे गृहित धरले तरी काँग्रेस मात्र भाजपला विरोध करील असे दिसते. म्हणजेच जोडीदार मिळवण्यामध्ये सेनेला भाजपपेक्षा अधिक संधी आहे. या व्यतिरिक्त सेना व भाजप या दोहोंनी एकत्र येण्याचा तिसरा पर्याय आहे. अनेकांच्या मते हाच खरा व पहिला पर्याय आहे. दिल्लीत नितीन गडकरी व मुंबईत चंद्रकांत पाटील इत्यादींनी तो जाहीरपणे सुचवला आहे. झाले गेले विसरून जावे आणि पुन्हा युती करावी असे गडकरी यांनी म्हटले आहे. सेनेतर्फे अजून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. पण निवडणुकांच्या प्रचारात सेना आणि भाजप यांनी एकमेकांविरोधात प्रचंड विषारी आणि विखारी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटराव किंवा गुंडांचे मुख्यमंत्री असे संबोधले होते. तर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी सेना व मातोश्रीवर माफियागिरीचा आरोप केला आहे. हे जर विसरले जाणार असेल तर मुळात या तऱहेने माघात शिमगा करण्याची गरज काय होती असा जनतेचा त्यांना प्रश्न राहील. शिवाय या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेत रस्ते, कचरा या सर्वच कंत्राटांमध्ये कोटय़वधींचा गैरव्यवहार तसेच काही बिल्डर्स व एसआरएच्या योजना यांचे उल्लेख झाले आहेत. या निव्वळ चिखलफेकीचा मामला होता की या प्रश्नांची तड लावण्याबाबत हे दोन्ही पक्ष खरेच गंभीर आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे. याच दरम्यान ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर असल्याचे जाहीर केले आहे. निकाल संपल्यानंतर ही नोटीस संपली का आणि सेना काय करणार याचे उत्तर लवकरात लवकर मिळावे लागेल. मुंबई पालिकेची मुदत आठ मार्चला संपत आहे. अकरा मार्चला उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप व मोदी लाटेला मोठा तडाखा बसेल असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव तर पंजाबमध्ये काँग्रेस किंवा आम आदमी पक्ष यांचा वरचष्मा राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे. उद्धव यांचे तिकडे लक्ष असणार यात शंका नाही. तिकडे मोदी व भाजप अडचणीत आले तर त्यांची आणखी कोंडी करण्यासाठी उद्धव यांना अनुकूल वातावरण निर्माण होईल. पण जर तसे झाले नाही तर त्यांची पंचाईत होईल. त्या स्थितीत उद्धव हे सत्तेबाहेर पडून भाजपशी पंगा घेण्याचा निर्णय घेणार का हा खरा प्रश्न आहे. भाजपने गेल्या निवडणुकांपासून त्यांना ज्या रीतीने वागवले आहे ते पाहता त्यांनी यापूर्वीच युती का तोडली नाही असे विचारणारेही बहुसंख्य आहेत. यावेळीही युती तोडण्यात शिवसैनिकांच्या दबावाचा मोठा हात होता. उद्धव यांनी प्रचारात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच त्यांना वाढीव मतदान झाले असाही अनेकांचा निष्कर्ष आहे. हे लक्षात घेता आता पुन्हा या मुद्यावर कच खाणे उद्धव यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. अर्थात सध्याच्या स्थितीत भाजपच्या विरोधकांची भूमिका बजावण्याचे काही राजकीय फायदे असले तरी ते सोपेही नाही याची उद्धव यांना कल्पना असेल. सेनेने भाजपच्या विरुद्ध ठाम भूमिका घेतली तर अगदी राष्ट्रवादी, मनसे किंवा काँग्रेसमधील अनेक घटकही त्यांच्या बाजूला येऊ शकतील. राज्यात त्यांना विस्तारासाठी अवकाश मिळेल. देशस्तरावरही त्यांची दखल घेतली जाऊ शकेल. पण निवडणुकीच्या काळात खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. सेना विरोधात गेली की उद्धव  ठाकरे यांच्यापासून सर्वांविरुद्ध होता होईल ती बदनामीची मोहीम भाजपतर्फे चालवली जाईल. या सर्व मोहिमेला अंगावर घेण्याची वैयक्तिक व संघटनात्मक तयारी कितपत आहे याचा अदमास उद्धव यांना घ्यावा लागेल. तसा तो ते सध्या घेत असतील. अर्थात शिवसेनेसारखा घरातलाच कडवा पक्ष शत्रू म्हणून झेलणे हे भाजपलाही सोपे जाणार नाही. शिवाय मोदींना झालेल्या मतदानात काँग्रेसबाबत असलेली तीव्र नाराजी हा मोठा घटक कारणीभूत होता. पण यातले बहुसंख्य पाठिंबा देणाऱयांचा आता मोदींबाबतही भ्रमनिरास झाला असू शकतो. त्या सर्वांना महाराष्ट्रात सेनेचा सहारा मिळू शकतो. हे सर्व बाजूला ठेवून मुंबई व मराठी माणसाच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे म्हणण्याचा एक पर्याय सेना व भाजप या दोन्ही पक्षांकडे आहे. भाजपने आत्ता तरी तसेच संकेत दिले आहेत. पण तो स्वीकारल्यास हा अवसानघात झाला अशी भावना भाजपपेक्षाही शिवसेनेच्या मतदारांमध्ये अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथून पुढे उद्धव ठाकरे यांची मोठी कसोटी आहे.

Related posts: