|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » …तर गोव्यात आंदोलनाचा इशारा

…तर गोव्यात आंदोलनाचा इशारा 

प्रतिनिधी/ मडगाव

महामार्गावरील दारु दुकानासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने गोव्यातील नव्या राज्य सरकारने तोडगा काढावा अन्यथा राज्यात आंदोलनाचा मार्ग  स्वीकारण्यात येणार असल्याचा इशारा काल शुक्रवारी मडगावात देण्यात आला.

‘सालसेत लिकर ट्रेडर, तावेर्ना व बार मालकां’ची एका सभा मडगावात आयोजीत करण्यात आली होती. त्यात अखिल गोवा बार मालक संघटनेचे अध्यक्ष मायकल क्रास्को, पणजीचे दत्तप्रसाद नाईक, झेव्हियर फर्नाडीस व अन्य उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या व्यवसायात असलेल्या शेकडो लोकांवर  उपासमारीची कशी पाळी येणार याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. राष्टीय महामार्ग व राज्य महामार्ग कोणते त्याची संबंधितांनी सर्वप्रथम जनतेला माहिती द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ात फ्लायओव्हर हा शब्द आलेला आहे का याचाही अभ्यास करण्यात येणार असल्याचे यावेळी एका वक्त्याने स्पष्ट केले. मडगावच्या फ्लायओव्हरपासून खारेबांद रस्त्यावर किती बार आहेत याचे सर्वेक्षण सरकारची काही खाते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाडय़ात फ्लायओव्हर आहे का याचा आता अभ्यास करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गोव्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निवाडय़ाचा फेरविचार करण्यात यावा असा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात यावा आणि गोव्यातील वस्तुस्थितीची कल्पना या न्यायालयाला देण्यात यावी असाही प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला.

गोव्यातील अनेक लोक पिढय़ानपिढय़ा दारुच्या या व्यवसायात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे हे लोक उघडय़ावर पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे गोव्यातील दारु संबंधी राज्य सरकारने एक धोरण निश्चित करावे अशी सुचनाही यावेळी करण्यात आले आणि इतके करुनही गोव्यातील बार मालकांचा हा प्रश्न  न सुटल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला.

Related posts: