|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत फक्त 333 धावांनी पराभूत

भारत फक्त 333 धावांनी पराभूत 

आकमक ऑस्ट्रेलियाचा तडफदार विजय, फिरकीसमोर विराटसेनेची शरणागती

पुणे / प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियाच्या ओ किफ आणि नेथन लायन या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय संघाने अक्षरश: गुडघे टेकल्याने भारताला ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 333 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे विराटसेनेचा अश्वमेध रोखला गेला आहे. ओ किफने दुसऱया डावातदेखील 6 बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. दोन्ही डावात 12 बळी घेणाऱया ओ किफलाच सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले. या विजयाने 4 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गहुंजे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यांच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 143 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आजचा पहिला एक तास भारतासाठी फार महत्वाचा होता. तिसऱया दिवसाच्या 8 व्या षटकात रवींद्र जडेजाने मिचेल मार्शल सहाकरवी झेलबाद करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाची 5 बाद 169 अशी स्थिती होती. मार्श बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक मॅथ्यू वेड कर्णधार स्मिथच्या साथीला मैदानात आला. पहिल्या एका तासात पाहुण्या संघाने टिच्चून खेळ करीत भारतावर 359 धावांची भक्कम आघाडी घेतली. 66 व्या उमेश यादवच्या षटकात वेड यष्टींमागे सहाकवी झेलबाद झाला होता. मात्र, पंचांनी त्याला सहमती दर्शविली नाही. पण त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर ऑफ स्ट्म्पच्या बाहेर असणाऱया चेंडूला कट करण्याच्या नादात मॅथ्यु वेड सहाकरवी झेलबाद झाला. या वेळी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 204 धावा झाल्या होत्या. यावेळी कर्णधर स्मिथ 92 धावांवर खेळत होता.

स्मिथचे दमदार शतक

वेड बाद झाल्यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून देण्यात मोलाचा वाटा उचलेला खेळाडू मिचेल स्टार्क मैदानात उतरला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आपले 18 वे शतक साजरे केले. पण 75 व्या षटकात डीप मिडविकेटवरून फटका मारण्याच्या नादात जडेजाने स्मिथला पायचीत केले. स्मिथने लगेचच तिसऱया पंचाकडे विचारणा केली. परंतु त्यांनीदेखील त्याला बाद ठरविले.

स्मिथने 202 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 109 धावा करून आपल्या संघाला सुस्थितीत नेले. तो बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 400 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली होती. तर धावफलकावर त्यांच्या 7 बाद 246 धावा झाल्या होत्या. स्मिथ बाद झाल्यानंतर स्टार्कने आक्रमक फलंदाजी सुरु केली. अश्विनचा एक चेंडू मिडविकेटवरून भिरकाविण्याच्या नादात मिचेल स्टार्क के राहुलकरवी झेलबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची 8 बाद 258 अशी स्थिती झाली होती.

स्मिथ आणि स्टार्क बाद झाल्यावर नेथन लायन, ओ किफ खेळण्यास आले. पण त्यांनादेखील जास्त वेळ मैदानात थांबता आले नाही. 84 व्या षटकात उमेश यादवने एका उकृष्ट इनस्विंगवर लायनला पायचीत केले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 279 धाव धावफलकावर झाल्या होत्या आणि त्यांच्याकडे 434 धावांची आघाडी होती. आता जास्तवेळ न घालवता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला बाद करून उपहारानंतर फलंदाजीस उतरावे, अशी सर्वच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा होती. रवींद्र जडेजाने ही अपेक्षा पूर्ण करीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 285 धावांत संपुष्टात आला. त्यांनी विजयासाठी भारतासमोर 441 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

भारताचा खराब प्रारंभ

उपहारानंतर 441 धावांच्या मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघाला सामना वाचवायचा अथवा जिंकायचा असल्यास दुसऱया डावात ‘विराट’ खेळ करावा लागणार हे नक्की होते. मात्र, दुसऱया डावाची खराब सुरूवात झाली. ओ किफच्या 5 व्या षटकातच धावफलकावर 10 धावा असताना विजय पायचीत झाला. यासाठी विजयने तिसऱया पंचांकडे रिव्हय़ू मागितला. पण, त्यांनीदेखील त्याला बाद ठरविले.

नॅथन लायनने पुढील षटकांतच आणखी एक डरकाळी फोडत के राहुलला पायचीत केले. त्यानेदेखील पंचांच्या निर्णयाविरोधात रिव्हय़ू घेतला; पण तो बाद असल्याचे तिसऱया पंचानी जाहीर केले. विजय व राहुल एकामागोमाग एक बाद झाले आणि भारताची 2 बाद 17 अशी अवस्था झाली. तसेच 6 व्या षटकातच भारतचे दोन्ही रिव्हय़ू संपले व भारताच्या अडचणी आणखी वाढल्या. अशा परिस्थितीत भारताचा पराभव होणार हे जवळपास निश्चित वाटत असताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या दोघांवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर मैदानात उभे ठाकण्याचे आव्हान होते. या दोघांनी पुढे 15 षटकांपर्यंत सावध खेळ करीत आणखी पडझड होऊ दिली नाही. या वेळी भारताच्या 2 बाद 41 धावा झाल्या होत्या. मात्र 17 व्या षटकात ओ किफने पुन्हा आपल्या फिरकीची जादू दाखवत कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडविला आणि भारतीय चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरविले. भारतीय संघाची 3 बाद 47 अशी दयनिय अवस्था झाली.

भरवशाच्या फलंदाजांची निराशा

कोहली बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे पुजाराच्या सोबतीला मैदानात उतरला. या दोघांनी 36 चेंडूत 30 धावांची भागीदारी केली. हे दोघे कुठेतरी सेट आहेत, असे वाटत असताना पुन्हा ओ किफने अजिंक्य रहाणेला कव्हर्समध्ये नॅथन लायनकरवी झेलबाद केले. रहाणेने 21 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. तेव्हा भारताची 4 बाद 77 अशी बिकट परिस्थिती झाली. पुजाराच्या साथीला आर. अश्विन फलंदाजीला आला. त्यालादेखील जास्त वेळ मैदानात तग धरता आला नाही. तोदेखील ओ किफच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला, अश्विनला आधी मैदानावरील पंचानी नाबाद ठरविले; पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्थिव्ह स्मिथने तिसऱया पंचांची मागणी केली असता त्यांनी अश्विनला बाद ठरविले. अश्विन बाद झाला त्यावेळी भारताची 5 बाद 89 अशी केवीलवाणी अवस्था झाली. वृद्धिमान सहा फलंदाजीला आला. मात्र, त्यालादेखील काही करता आले नाही.

चहापानापूर्वी काही वेळ बाकी असताना ओ किफने सहाला आपला शिकार बनविले. चहापानाच्या विश्रांतीनंतर ओ किफने पहिल्याच षटकात चेतेश्वर पुजाराला पायचीत केले. यावेळी भारताची 7 बाद 100 अशी अवस्था झाली. लायनने पहिल्यांदा रवींद्र जडेजाचा त्रिफळा उडविला आणि नंतर उमेश यादवलादेखील डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद करीत माघारी धाडले. दुसऱया डावात भारत पहिल्या डावात केलेल्या 105 धावांचा आकडा पार करतो की नाही, असे वाटत होते. पण 103 धावा असताना चौकार मारत भारताने पहिल्या डावातील 105 धावांचा आकडा पार केला. पण पुढच्या चेंडूंत लायनने जयंत यादवला बाद करीत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. भारताचा दुसरा डाव 107 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 333 धावांनी आपल्या नावावर केला. दुसऱया डावात ऑस्ट्रेलियाकडून ओ किफने 15 षटकात 35 धावा देत 6 बळी घेतले, तर नेथन लायनने 14 षटकात 53 धावा देत 4 बळी घेतले. या सामन्यात दोन्ही डावात मिळून सर्वाधिक 12 बळी घेणाऱया ओ किफला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 260, भारत पहिला डाव : सर्वबाद 105, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : सर्वबाद 285, भारत दुसरा डाव : 33.5 षटकात सर्वबाद 107. (चेतेश्वर पुजारा 31, अजिंक्य रहाणे 18, विराट कोहली 13, केएल राहुल 10. अवांतर 12. ओकिफे 35 धावात 6 बळी, नॅथन लियॉन 53 धावात 4 बळी).