|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन नगरसेवकांसह तिघा जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

दोन नगरसेवकांसह तिघा जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा 

झुल्पी खतीबची अखेर पोलिसांत फिर्याद

प्रतिनिधी/ बेळगाव

अपहरण करून बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून दोन नगरसेवकांसह तिघा जणांविरुद्ध शनिवारी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून चर्चेत असलेल्या झुल्पी खतीब या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक मतीन शेखअली, अक्रम बाळेकुंद्री व मेंडा इम्रान या तिघा जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात अपहरण व मारहाणीसंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अरुण नागेगौडा या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बेळगाव येथील रियल इस्टेट व्यावसायिकांना भटकळमधील एका युवकाने कोटय़वधी रुपयांना गंडविल्यासंबंधी गेल्या दीड महिन्यापासून शहरात चर्चा सुरू होती. मात्र ज्यांची फसवणूक झाली आहे त्यापैकी आजवर कोणीच पोलिसांत फिर्याद दाखल केली नाही. फसवणुकीचा आकडा 100 कोटी रुपयांच्यावर असल्याचीही चर्चा सुरू होती.

गेल्या 15 दिवसांपूर्वी झुल्पी खतीब याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती बाहेर पडली होती. जखमी अवस्थेतील झुल्पीची छायाचित्रेही व्हायरल झाली होती. तरीही या संबंधी फिर्याद दाखल झाली नव्हती. वीरभद्रनगर येथे राहणाऱया झुल्पीने दिलेल्या फिर्यादीनुसार मार्केट पोलिसांनी दोन नगरसेवकांसह तिघा जणांविरुद्ध अखेर एफआयआर दाखल केले आहे.

1 फेब्रुवारी रोजी मतीन शेखअली, अक्रम व मेंडा इम्रान यांनी आपले अपहरण करून बेदम मारहाण केली आहे. या तिघा जणांकडून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना धोका असल्याचे सांगून झुल्पीने पोलीस आयुक्तांना पोस्टाद्वारे पत्र पाठविले होते. पोलीस आयुक्तांनी हे पत्र मार्केट पोलिसांकडे सोपविले होते. याच पत्राच्या आधारावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. 

Related posts: