|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उत्तर प्रदेश : होळी अगोदर शिमगा

उत्तर प्रदेश : होळी अगोदर शिमगा 

निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे प्रकार सर्वच पक्ष करत असताना भाजपने उत्तर प्रदेशातील एकमेव लोकप्रिय वर्तमानपत्र समजल्या जाणाऱया दै.जागरणला हाताशी धरले आहे. पहिल्या फेरीचा एक्झिट पोल जागरणने प्रकाशित करून भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे असा दावा केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रचाराची धूळ जोराने उडत आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांवर राळ उडवण्यात एवढे गर्क झाले आहेत की स्वातंत्र्योत्तर भारतातील ही सगळय़ात मोठी धुळवड सुरू झाली आहे असे चित्र दिसत आहे. ‘जो आपल्या बापाचा झाला नाही तो जनतेचा कसा बरे होईल?’ असा जाहीर सवाल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे विरोधक विचारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी तर प्रचारात आकाशपाताळ एक केले आहे. ‘मियाँ मुशर्रफ’, ‘हम पाच हमारे पचिस’ अशा वादग्रस्त मुद्यांचा वापर करून मोदींनी गुजरात नेहमी लीलया जिंकला होता. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांनी ‘रामशान’ आणि कब्रिस्तान आणि दिवाळी आणि रमझान हे मुद्दे आणून धार्मिक ध्रूविकरणाला सुरुवात केली आहे. त्यांचे विरोधक फार साव आहेत, सज्जन आहेत असे नव्हे. मायावतींनी 100 मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मुस्लीम गळाला लागला की दलित+मुस्लिमांच्या पाठिंब्याने आपण पुढील मुख्यमंत्री होणार असे मायावतींचे सरळ गणित आहे. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ प्रमाणेच भाजपबरोबर तीनदा सत्तेत येऊन देखील मायावती आपणच कसे मुस्लीम हितैषी आहोत असे दाखवत आहेत. ‘गुजरातच्या गाढवांचा प्रचार थांबवा’ असे गुजरातचे ब्रँड ऍम्बेसॅडर असलेल्या अमिताभ बच्चनना आवाहन करून पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना अखिलेशनी सणसणीत टोला हाणला आहे. बिहारचा पराभव जिव्हारी लागलेल्या पंतप्रधानांनी प्रचारात सर्वस्व झोकून दिलेले आहे. राज्यातील 403 मतदारसंघांमधील एकाही मतदारसंघात भाजपने मुस्लीम उमेदवार उतरवलेला नाही. अशामुळे ‘सब का साथ सब का विकास’ कसा बरे होणार या प्रश्नाला पक्षाकडे उत्तर नाही. ‘जो जिंकून येऊ शकतो त्यांनाच आम्ही तिकीट देतो’ असे भाजप अध्यक्षांचे म्हणणे आहे.

मोदींना ‘रावण’ म्हणून संबोधणारे समाजवादी पक्षाचे जहाल नेते आझम खान या निवडणुकीत अडचणीत आलेले आहेत. आझम खान यांना त्यांच्या रामपूरच्या बालेकिल्ल्यातच बसपने एक दबंग मुस्लीम उमेदवार आणि भाजपने एक जहाल हिंदू उमेदवार उतरवून कोंडीत पकडले आहे. मुझफ्फरनगर दंग्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले होते पण यंदा त्याच भागात-पश्चिमी उत्तर प्रदेशात बसपने भाजपला जोरदार टक्कर दिलेली दिसत आहे. त्या भागातील कैराना भागातून हिंदूंचे पलायन झालेले आहे असा कांगावा करणारे तेथील भाजप खासदार हुकमसिंग यांना आपली विधानसभेची जागा राखणे कठीण झालेले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील कैराणा घराणे लोकप्रिय आहे तेच है कैराणा.

मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रोड शो दरम्यान आजारी पडलेल्या सोनिया गांधींनी आता प्रचारसभांचाच धसका घेतलेला दिसत आहे. प्रचाराला बाहेर न पडता आपल्या अमेठी-रायबरेलीमधील मतदारांना त्यांनी पत्र लिहिले आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचे महानायक म्हणून भाजपने गौरवलेले लालकृष्ण अडवाणी हे आपल्या दिल्लीच्या घरातच बसून राहिले आहेत. पक्षाला त्यांच्या तसेच मुरली मनोहर जोशींच्या सेवेची गरजच उरलेली दिसत नाही. म्हाताऱयांनी पत्ते कुटत बसावे असेच मोदींचे मत दिसत आहे. मुलायमसिंग यादव यांनी इन मिन फक्त दोनच सभा केल्या आहेत. सोनियांना राहुलला ‘सिंहासन’ द्यायचे आहे. पण आपला बाळ किती गुणी आहे याबद्दल महाराष्ट्रातील ताज्या निकालांनी त्यांच्या मनात परत चिंता निर्माण केली आहे.

हवा कोणाची?

उत्तर प्रदेशची निम्मी निवडणूक सरली तरी कोण विजयी होणार याबाबत भल्याभल्यांना अजूनही स्पष्टता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात सर्वस्व झोकलेले आहे तर त्यांना तितक्मयाच जोराने मुख्यमंत्री अखिलेश यादव हे टक्कर देत आहेत. अखिलेशबरोबर प्रचारात असलेले राहुल गांधी मात्र थोडे फिके पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसची धुरा सांभाळायला निघालेल्या राहुलना अजून राजकारणात बरेच काही शिकायचे आहे हे या प्रचारात प्रखरपणे दिसून येत आहे-जाणवत आहे. प्रियंका गांधी कितपत प्रचार करणार याबाबत चर्चेचे वायफळ गुऱहाळ आता आटले आहे. प्रियंकानी अमेठी-रायबरेलीमधील मतदारसंघात स्वतःला सीमित करून घेतले आहे. काँग्रेसची ही ठेव लोकसभा निवडणुकीतच वापरली पाहिजे असा तर्क पक्षातील धुरीण देत आहेत. तर खरे कारण म्हणजे प्रियंका सक्रिय झाल्या तर राहुलचे कसेबसे चाललेले दुकान बसेल या भीतीने सोनिया गांधींनीच त्यांना रोखले आहे असे पक्ष वर्तुळात ऐकू येत आहे.

गमतीची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत अखिलेश यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी डिंपल यादव या स्टार प्रचारक बनल्या आहेत. ‘अखिलेशभैया प्रचाराला येऊ शकत नसतील तर डिंपलभाभींनी तरी अवश्य यावे’ अशी प्रचारासाठीची सुपारी डिंपलना समाजवादी पक्षाच्या उमेदवारांकडून मिळू लागली आहे. काँग्रेस उमेदवारांमध्ये देखील डिंपलभाभींविषयीचा आदर वाढला आहे. याउलट काँग्रेसमध्ये स्टार प्रचारक कमी पडत आहेत. गुलाम नबी आझाद स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवत असले तरी त्यांच्या सभांना अजिबात गर्दी दिसत नाही.  त्यांचे हेलिकॉप्टर घेऊन हिंडणे मात्र सुरू आहे. निवडणुकीच्या समितींमध्ये स्थान न मिळालेले बरेच नेते दिल्लीत राहून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. एकसुरी भाषणे वाचून दाखवण्याचा कार्यक्रम यंदादेखील मायावतींनी चालू ठेवला आहे. आता सत्तेत आले तर मोठमोठे पुतळे उभारणार नाही असे त्या जनतेला निक्षून  सांगत आहेत. ‘मायावतींना मत म्हणजे भाजपला मत’ असा प्रचार करून डिंपल यादवांनी खळबळ माजवलेली आहे. भाजप आणि बसपचा गुप्त करार अगोदरच झालेला आहे असा दावा करून मायावती सत्तेकरता काहीही करू शकतात असा समाजवादी नेत्यांचा आरोप आहे. ‘काँग्रेस, सप आणि बसप’ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ‘कसाब’ आहेत असे वर्णन करून अमित शहांनी एक नवीन वाद निर्माण केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे प्रकार सर्वच पक्ष करत असताना भाजपने उत्तर प्रदेशातील एकमेव लोकप्रिय वर्तमानपत्र समजल्या जाणाऱया दैनिक जागरणला हाताशी धरले आहे. पहिल्या फेरीचा एक्झिट पोल जागरणने प्रकाशित करून भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे असा दावा केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे निवडणूक आयोगाने या वर्तमानपत्राविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. प्रशांत किशोर यांच्यानुसार सप व काँग्रेसच्या युतीला 160 ते 170, तर भाजपला 160 जागा मिळणार आहेत.

Related posts: