|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापुरात 300 हेक्टरवर होणार फळबाग लागवड

राजापुरात 300 हेक्टरवर होणार फळबाग लागवड 

मनरेगा अंतर्गत 40 गावांची निवड

वार्ताहर / राजापूर

शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील चाळीस गावांमधील सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजूची फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या फळबाग लागवडीमुळे ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असून शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.  

ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत आता कोकणातील वातावरणाला पोषक असलेल्या आंबा व काजू फळझाडांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱयांच्या पडीक कातळ जमिनी शोधून त्यावर फळबाग लागवडीसाठी शेतकऱयांना प्रवृत्त करण्याचे काम कृषी विभाग करणार आहे. यावर्षी पावसाळय़ात ही लागवड करण्यात येणार असून पुढील 2 वर्षे खत, पाणी देण्यासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण लागवड व देखभाल शेतकऱयाला करावी लागणार आहे.

मनरेगा अंतर्गत राजापूर तालुक्याला 300 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत फळबाग लागवड करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील 8 मंडलांमधून प्रत्येकी 5 गावे अशा 40 गावांची फळबाग लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार तालुका कृषी विभागाने आराखडा तयार केला असून या आराखडय़ात नाटे, जैतापूर, कोंडय़े तर्फ सौंदळ, ओणी, कुंभवडे, राजापूर, पाचल आणि सौंदळ या आठ मंडलातील 40 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये कोंडसर, धाऊलवल्ली, भालावली, कशेळी, सोलगाव, मिठगवाणे, गोठीवरे, अणसुरे, कारीवणे, जानशी, पांगरे, तळगाव, मारोशी, केळवली, पन्हळे तर्फ सौंदळ, ओणी, चिखलगाव, मंदरूळ, पेंडखळे, कुंभवडे, नाणार, शिळ, धोपेश्वर, भू, देवाचे-गोठणे, गोवळ, खरवते, मूर, परूळे, मिळंद, हरळ, तळवडे, कोळंब, रायपाटण, आंगले, फुपेरे, ओशिवळे, कोळवणखडी, ताम्हाणे या गावांचा समावेश आहे. या आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणी करताना उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे. ।।

Related posts: