|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अडरे ग्रामपंचायत इमारत जमीनदोस्त

अडरे ग्रामपंचायत इमारत जमीनदोस्त 

प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम,

आदेशानंतर चार वर्षे निर्लेखन नाही,

प्रशासन, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप

प्रतिनिधी /चिपळूण

अडरे येथील शंभर वर्षाची साक्ष देत जीर्ण झालेली ग्रामपंचायतीची इमारत शनिवारी जमीनदोस्त झाली. चार वर्षापूर्वी इमारतीच्या निर्लेखनाचे आदेश देऊनही आजतागायत त्याकडे दुर्लक्ष करणाऱया ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या इमारतीच्या बाजूला असलेल्या गाळय़ातील अंगणवाडी काही दिवसांपूर्वीच इतरत्र हलवल्याने आज मोठा अनर्थ टळला.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीची ही जीर्ण वास्तू कोसळण्याच्या मार्गावर होती. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही. याच वास्तूमध्ये 2016पर्यंत अंगणवाडी सुरु होती, परंतु शाखाप्रमुख शशिकांत कदम आणि त्यांच्या सहकाऱयानी मोडकळीस आलेल्या वास्तूमधून चिंमुकल्यांची सुटका करताना नवीन अंगणवाडी मिळवून दिली. आज ही अंगणवाडी झाली नसती तर मोठय़ा दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शनिवारी कोसळलेल्या या वास्तूमध्येच अडरे ग्रामपंचायतीची ग्रामसभा होत होती. शेवटची ग्रामसभा 23 दिवसांपूर्वी म्हणजेच 4 फेब्रुवारी रोजी याचठिकाणी पार पडली. पुढील ग्रामसभादेखील याचठिकाणी होणार होती. मात्र अखेर ही इमारत पूर्णपणे कोसळली आहे.

या कोसळलेल्या इमारतीला 2013मध्येच निर्लेखनचे आदेश मिळूनदेखील तिचे निर्लेखन करण्यात आलेले नव्हते. याबाबत गट शिक्षणाधिकाऱयांना लेखी व तोंडी कळवूनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच लोकशाही दिनालादेखील प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन देऊनदेखील त्यांनी अद्यापही कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्याचे उत्तर दिलेले नाही. प्रशासनाने जर वेळीच दखल घेतली असती तर आज ही नामुष्की अडरे शाळेवर आली नसती.

या वास्तूच्या निर्लेखनाबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयानी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे. तसेच पुढील ग्रामसभेत सरपंचाना याचा जाब विचारून त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.

Related posts: