|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सराफ व्यावसायिकांनी आमिषाला बळी पडू नये

सराफ व्यावसायिकांनी आमिषाला बळी पडू नये 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूरच्या सराफ व्यावसायिकांकडून आजपर्यंत पोलिसांकडे कोणतीच तक्रार आलेली नाही, हाच या व्यवसायाचा मानदंड आहे. येथून पुढेही सराफ व्यावसायिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक (शहर) भारतकुमार राणे यांनी केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘सराफ व्यावसायिकांनी घ्यावयाची दक्षता’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विशेष पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक होते.

सराफ व्यवसाय व पोलीस यांच्या नात्याकडे बघण्याचा अनुभव वाईट असल्याचे बोलले जाते. पण कोल्हापुरात आजअखेर असा कोणताच वाईट अनुभव आलेला नाही. जे संघटनेचे सदस्य नाहीत अशा लोकांकडूनच आमिषाला बळी पडण्याचे प्रकार होत असतात. जर सराफ व्यावसायिकांना कोणाकडून त्रास होत असल्यास मला तात्काळ मोबाईलवर संपर्क साधा. अशांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन राणे यांनी दिले. कोल्हापूरचे दागिने निर्यात करण्यासाठी संघटनेचा महासंघ तयार करा. या महासंघाद्वारे दागिन्यांची निर्यात करून परदेशी चलन मिळवावे, असेही राणे यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात, कोल्हापूरच्या सराफ व्यवसायाचे कौतुक केले. येथील दागिन्यांचे नाव देशभरात पोहोचले आहे. या व्यवसायात युवा पिढीही उतरू लागली आहे. या युवा पिढीने पारंपरिक व्यवसायापेक्षा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच हा व्यवसाय ऑनलइा&नद्वारे जगभरात पोहोचवावा, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले.

सराफ व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी चेंबरही पाठीशी राहील, असे प्रतिपादन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.

प्रास्ताविकात कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी भविष्यात सराफ संघामार्फत टंच रिफायनरी, आभूषण प्रदर्शन, चांदी पेटी कटींग मशिन व वेबसाईट सुरू करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ज्येष्ठ सराफ व्यावसायिक, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार व बक्षिस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आभार विजय हावळ यांनी मानले.

कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी पोलीस प्रमुख भाग्यश्री नवटके, प्रदीपभाई कापडिया, सुरेंद्र पुरवंत, उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सुरेश गायकवाड, जयेश ओसवाल, मनिष झंवर, राजेश राठोड, माणिक जैन, अनिल पोतदार, जितेंद्र राठोड, धर्मपाल जिरगे, सराफ व्यावसायिक, सभासद उपस्थित होते.

Related posts: