|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » झुआरीनगरात भाजपा व काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी, घटनेमुळे तणाव

झुआरीनगरात भाजपा व काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी, घटनेमुळे तणाव 

वार्ताहर/ झुआरीनगर

मागच्या महिन्यात मतदाना दिवशी सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगीरी अद्यापही थंडावलेली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झोडण्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळीही झुआरीनगरात घडली. स्थानीक पंच रंगप्पा कमल व त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मारहाण झाली. या घटनेमुळे झुआरीनगरात बराच वेळ तणाव निर्माण झाला. त्वरीत मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्याने पुढील अनर्थ टळला. ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढानाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

  पंच रंगाप्पा कमाल हे भाजपाचे कार्यकर्ते असून त्यांचे मामा व कुटुंबच भाजपाच्या कार्यात आहे. त्यांच्या मामांना विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. या हिंसक घटनेमुळे त्या संध्याकाळीही झुआरीनगरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस स्थानकासमोर निदर्शने केलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी पोलिसांनी गुंडाना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु सदर गुंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच काल मंगळवारी संध्याकाळी पुन्हा त्याच काँग्रेसच्या गटातील गुंडांकडून पंच रंगप्पा व त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना मारहाण करण्यात आली. यात दोन अल्पवयीन मुले, महिला व पंच रंगप्पा यांचे बंधु तसेच अन्य सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या मदतीने जखमींवर कासावलीतील प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.  या मारहाण प्रकरणात गुंतलेल्यांमध्ये कुठ्ठाळीचे जिल्हा पंचायत सदस्य व कुठ्ठाळीचे काँग्रेसचे उमेदवार मारीयान रॉड्रिक्स व त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकीही काहीजण जखमी झालेले आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट एकमेकांविरूध्द तक्रार करण्यासाठी वेर्णा पोलीस स्थानकात हजर होते.

  या घटनेप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. झुआरीनगरातील कुठ्ठाळीचे जिल्हा पंचायत सदस्य मारीयान रॉड्रिक्स यांच्या घराजवळ मुख्य रस्त्यावर मारीयान रॉड्रिक्स व पंच रंगप्पा यांच्या वाहनांमध्ये किरकोळ अपघात झाल्याने बाचाबाची झाली व त्यानंतर मारहाणीची घटना घडली. जिल्हा पंचायत सदस्य रॉड्रिक्स यांनी मुद्दामहून अपघात घडवून आपल्याला मारहाण केल्याचा दावा पंच रंगाप्पा यांनी केला आहे. ही मारामारी पाहून रंगाप्पा याला सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मारहाण झाली. रॉड्रिक्स यांच्या बाजुनेही त्यांचे कार्यकर्ते या मारहाणीत सामील झाले. त्यामुळे दोन्ही गटांकडून मारमारी आणि दगडांचा वर्षाव झाला. या घटनेनंतर झुआरीनगरात बराच तणाव निर्माण झाला. मारहाणीचा हा प्रकार वाढत असतानाच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अधिक पोलीस फौजफाटा बोलावण्यात आला. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण राहिले. अन्यथा दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली असती.

  या घटनेची माहिती मिळताच मंत्री एलिना साल्ढाणा घटनास्थळी दाखल झाल्या. मागील पाच वर्षे झुआरीनगरात पूर्ण शांतता होती. परंतु निवडणुकापासून गुंडगिरीला पुन्हा सुरवात झाली.  निवडणुकीच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यावर याच लोकांनी हल्ला केला. या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना जर यावेळी अटक करून कडक कारवाई केली असती तर आज असा हल्ला करण्याची त्यांची हिमंत झाली नसती अशी प्रतिक्रीया एलिना साल्ढाना यांनी व्यक्त केली.

  या घटनेमागे राजकीय पुर्ववैमनस्यच होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळापासून सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगीरी अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येते. मतमोजणीचा दिवस येईपर्यंत आणि त्यानंतरही अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  

 

Related posts: