|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे

शालेय विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे महत्व कळायला हवे 

प्रतिनिधी/ केपे

सिंगापूर सारख्या देशात आर्थिक गुंतवणुकीचे महत्व विद्यार्थ्यांना शालेय स्थरावरच शिकविले जाते, त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना कोणतीच आर्थिक समस्या निर्माण होत नाही. त्याच धर्तीवर आपल्या देशात व खास करून गोव्यात शालेय स्थरावरच विद्यार्थ्यांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्व शिकविले पाहिजे असे विधान डॉ. सेल्सो फर्नांडिस यांनी केले.

पेशाने दंत चिकित्सक असलेले डॉ. सेल्सो फर्नांडिस हे आज गोव्यातील एक आघाडीचे आर्थिक गुंतवणूक तज्ञ बनले आहेत. त्याच्या ‘लेट चैस मनी यू’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि. 3 मे रोजी होत असून त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. फर्नांडिस यांनी वरील विधान केले.

डॉ. सेल्सो फर्नांडिस हे गेली 20 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. मडगाव व नावेली येथे त्यांची दोन क्लिनिक कार्यरत होती. पण, त्यांनी आर्थिक गुंतवणूकीवर अभ्यास करण्यास प्रारंभ केला व मडगावातील क्लिनिक बंद करून आर्थिक गुंतवणूक या विषयावर जास्त लक्ष केंद्रीत केले. आज, संपूर्ण गोव्यात त्यांची आर्थिक गुंतवणूकीवर मार्गदर्शन शिबीरे होत असतात.

आज आर्थिक गुंतवणूक खुपच महत्वाची बनली आहे. जर आर्थिक गुंतवणूकीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात त्याचे जबर परिणाम सर्वांनाच सहन करावे लागणार असल्याचे मत यावेळी डॉ. फर्नांडिस यांनी व्यक्त केले. आज डॉक्टर, इंजिनियर हे सुद्धा रोजंदारीवर काम करणाऱया कामगारासारखेच आहे. जर त्यांनी आपली प्रेक्टीस केली नाही तर त्यांना पैसा मिळणार नाही. हा पैसा व्यवस्थित गुंतविला तर ते भविष्यात सुखी-समाधानी जीवन जगू शकतात असे मत यावेळी व्यक्त केले.

आज डॉ. सेल्सो फर्नांडिस हे नव विवाहिताना देखील आर्थिक गुंतवणूकीचे महत्व पटवून देतात, नवरा-बायको यांच्यात आर्थिक गुंतवणूकीच्या संदर्भात एकमत असेल तरच भविष्यात संसार सुखाचा होऊ शकतो, अन्यथा परिस्थिती वाईट असते, आज माणसांचे राहणीमान बदलले आहे. माणसांच्या गरजा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा हवाच असतो, त्यामुळे पैसा व्यवस्थित गुंतविल्यास पैशांची कधीच समस्या भासणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.

डॉ. फर्नांडिस यांनी नवे मार्ग फांऊडेशनची स्थापना केली असून या फांऊडेशन व लायन्स क्लबच्या माध्यमातून समाज सेवेचा उपक्रम देखील हाती घेतला आहे. मडगाव, नावेली, केळशी, फोंडा, कुडचडे, काणकोण, झुवारीनगर, अळदोणा इत्यादी परिसरातील काही स्कूलांना सुलभ शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

या पूर्वी डॉ. फर्नांडिस यांचे ‘हू सेस् मनी डॉन्ट ग्रो ऑन ट्री’ (कोण म्हणतोय झाडाला पैसे लागत नाही) पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकाने अनेकांना गुंतवणूकीचा सर्वोत्तम मार्ग दाखवून दिला आहे. या पुस्तकाचे लेखन व संपादन  श्री पवन यांनी केले आहे.   

Related posts: