|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मराठीला अडिज हजार वर्षांचा वैभवशाली वारसा

मराठीला अडिज हजार वर्षांचा वैभवशाली वारसा 

प्रतिनिधी/ पणजी

गोमंत विद्या निकेतनच्या ‘आस्वाद’च्या खास कार्यक्रमात कुसुमाग्रजांची जयंती तथा मराठी गौरव दिन ‘वारसा मराठीच्या’ या अभिनव परिसंवादाद्वारे साजरा करण्यात आल. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. स्नेहा म्हांबरे आणि डॉ. सचिन कांदोळकर या तीन वक्त्यांनी मराठी भाषेच्या उगमापासून तिच्या आधुनिक कालखंडापर्यंत तिचा प्रवाह, विकास आणि वाटचाल यांचा सखोल आढावा घेतला. परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रा. माधवराव कामत यांनी भूषविले.

  मराठीला अडिज हजार वर्षांची परंपरा

यावेळी बोलताना कृष्णाजी कुलकर्णी म्हणाले की मराठी भाषेचा उगम आणि तिचे भरणपोषण मौखिक परंपरेतून झाले आहे. अडीच हजार वर्षांपासून ही भाषा विकसित होत गेली आहे. सुरुवातीला वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांची नेंद करण्याची निकड या शास्त्रातील धुरीणांना भासली. नंतर धर्मशास्त्राची जोड या भाषेला मिळाली तरी लिखित साधानसामुग्रीच्या अभावी शिलालेख, ताम्रपट, भुर्जपत्रे आदींचा उपयोग या नोंदीसाठी करण्यात आला. हा तसा चाचपडण्याचाच कालखंड होता.

ज्ञानेश्वरांनी मराठीला साहित्यिक मूल्य दिले

भाषेला साहित्यिक मूल्य प्राप्त होण्यासाठी ओवी हा छंद ज्ञानेश्वरांना उपयुक्त ठरला. भावार्थदिपीका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथात भाषेचे वैभव असले तरी ज्ञानेश्वरांची खरी प्रतिभा त्यांच्या चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव या कृतींतून दिसते. लिलाचरित्रासारखा चक्रदरस्वामींचा ग्रंथही आद्य मराठीचे वैभव मिरवतो. संत नामदेव यांनी मराठी भाषेची सरसता, गुणवत्ता थेट पंजाब प्रांतापर्यंत भिडवली हे त्यांचं मोठं योगदान आहे. भाषाभाषामधील देवाणघेवाणीची लवचिकता, मराठी या शब्दाचे मूळ कानडी आहे, असाही एक अभिप्राय आहे. विठ्ठल तर कानडाच आहे. म्हणून महाराष्ट्री, मरहट्टी या शब्दावरुन आजचा ‘मराठी’ हा शब्द रुढ आहे आणि भक्तीसंप्रदाय-वारकरी संप्रदायाने आजच्या मराठी भाषेची खऱया अर्थाने पायाभरणी आणि निगराणी केली आहे, असेही ते म्हणाले.

शिवरायांचे मराठीला अभयदान : म्हांब्रे

यावेळी स्नेहा म्हांब्रे म्हणाल्या की, मध्ययुगीन मराठी वारसा महाराष्ट्रातच नव्हे तर त्या त्या प्रदेशातील संतकवींनी आपापल्या परीने शर्थीने पेलल्याचे दिसते. एका परिने ही संतमंडळींची समांतर वाटचाल म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युगप्रवर्तक कार्य मराठी भाषेला प्रोत्साहकच नव्हे तर अभयदान देणारे आहे हे महाराजांच्या समकालीन संतांना जाणवले. म्हणून तुकाराम, रामदास, जनाबाई, एकनाथ तसेच अठरा पगड जातींतून आलेल्या संतांनी मराठी भाषेला नवसंजीवनी दिली. अभंग, भारुड, गवळणी आणि कीर्तनासारख्या प्रचारकी कार्यक्रमांनीही या भाषेची मौखिक परंपरा समृद्ध केली आणि नंतर लिखित स्वरुपात हे अक्षरधन आमच्यापर्यंत आले. पेशवाईत पोवाडे, लावण्यांचा सुकाळ हे सुद्धा भाषा अभिजन तसेच तळागाळाच्या माणसापर्यंत झिरपत रहावी यासाठी अप्रत्यक्षपणे संत-पंत-शाहीर-लावणी रचनाकार यांनी मराठी भाषेला दिलेले योगदानच म्हणायला हवे.

वारकरी संप्रदायाने आराध्य दैवत श्री विठ्ठल भक्तीद्वारे जातीभेदरहित सामाजिक आणि भाषिक अभिसरणाचे जे काम केले आहे ते अजोड आहे. समता, बंधुता ही मुल्ये नंतरच्या आधुनिक विचारसरणीला बळ देणारी ठरली आहेत. ख्रिस्तपुराण हे फादर स्टिफन्सरचित महाकाव्य गोव्याचा मराठी वारसा अधोरेखित करणारे आहे, असे त्या म्हणाल्या. 

मराठीला गोमंतकीयांचे योगदान

डॉ. सचिन कांदोळकर यावेळी म्हणाले की शांबाराव सुर्यराव सरदेसाई, अ. का. प्रियोळकर, आचार्य धर्मानंद कोसंबी, लक्ष्मणराव सरदेसाई, बा. द. सातोस्कर, बा. भ. बोरकर, कवी दामोदर अच्युत कारे हे आधुनिक कालखंडाचे मानकरी गोमंतकीय आहेत. गोमंत विद्या निकेतन या संस्थेने या प्रदेशांतील मराठी साहित्य संमेलनाची पायाभरणी केली हे आपणाला कसे विसरता येईल? केशवसुतांपासून अलिकडच्या नामदेव ढसाळांपर्यंत कथाकार, लघुनिबंधकार, कवी, कादंबरीकार यांची नामावली जरी घेतली तरी मराठी या भाषेचं योगदान आणि तिचा दर्जा याबाबत दुमत होणार नाही याबाबत मी नि:शंक आहे. नारायण सुर्वे यांच्यासारखा तळागाळांतून आलेला कवी दलित साहित्याला भाषेच्या केंद्रस्थानी आणतो. नेमाडेंसारखा कादंबरीकार ‘कोसला’द्वारे भाषेला नवे आयाम देतो. तेंडुलकरांसारखा नाटककार मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर तळपत ठेवतो. कुसुमाग्रज, खांडेकर, विंदा करंदीकर, नेमाडे, एलंपुंचवार, श्याम मनोहर, दया पवार हे मराठीच्या पालखीचे भोयी आहेत आणि हा वारसा आपणाला जपायचा, जोपासायचा आहे याचे आजच्या दिनी आपले भान सुटू नये असे मला वाटते, असे ते शेवटी म्हणाले.

सावरकरांनी राष्ट्रचेतना जागविली

प्राचार्य माधवराव कामत म्हणाले की 1920-1930 हा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासात विचारांचे स्फुल्लींग पेटवणारा कालखंड. दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर, सावरकर यांनी मराठी भाषेचे वैभव वाढवताच राष्ट्रचेतना जागवली हे महाराष्ट्राचे उर्वरीत देशाला योगदान आहे. गांधी हे जसे युगपुरुष तशाच तोडीचे मराठी युगपुरुष राष्ट्रीय पुढारी म्हणून उदयास आले ते त्यांच्या तेजस्वी लेखणी आणि पत्रकारितेद्वारे. विचाराची शलाका एवढी शक्तिशाली असते की तिच्या सामर्थ्याने समाजाला ध्येयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्र आणि मराठी भाषेने हे इतिहासदत्त कार्य आपल्या सुपुत्रांद्वारे यथार्थपणे निभावले आहे. याबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करायची संधी मला लाभत आहे याचा मनाला आनंद होत आहे. संस्थेचा हा अभिनव उपक्रम स्तुत्य आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी स्वागत आणि आपल्या प्रास्ताविक भाषणात कुसुमाग्रज यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन कले. उपाध्यक्ष सुहास नायक यांनी आभार मानले. स्वरुपा शिकनीस यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: