|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निधीअभावी शासकीय विश्रामगृहाचे काम चार महिने बंद

निधीअभावी शासकीय विश्रामगृहाचे काम चार महिने बंद 

वार्ताहर/ कराड

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कराडच्या शासकीय विश्रामगृहाचे काम निधीअभावी बंद पडले आहे. गेले चार महिन्यांपासून निधीच नसल्यामुळे ठेकेदाराने पूर्णपणे काम बंद ठेवले आहे. तर तहसील कार्यालयाच्या जागेवर बांधण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही आता निधीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडला कोटय़वधी रूपयांचा निधी दिला. यातील काही कामे पूर्ण झाली तर अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कराड शहराला जोडणारे सर्व रस्ते चारपदरी करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. यातील बहुतांश रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच पोलीस वसाहत, तालुका पोलीस ठाण्याची इमारत, प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह आदी महत्वाची कामे मंजूर करण्यात आली.

 मात्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मंजूर कामांना निधीची चणचण भासू लागली असल्याचे समोर येत आहे. कराड येथे बांधण्यात येत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे काम निधीअभावी बंद पडले होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करून पुन्हा या कामास दोन महिन्यांपूर्वी सुमारे 7 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केल्याने कृषी महाविद्यालयाचे काम मार्गी लागले आहे.

पैसेच येत नसल्याने ठेकेदारांची

जैसे थेची भूमिका

कराडच्या नवीन शासकीय विश्रामगृहासाठी जवळपास 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र चार महिन्यांपासून निधीच नसल्याने शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पैसेच येत नसल्याने संबंधित ठेकेदाराने जैसे थेची भूमिका घेतली आहे. तर कराड तालुका पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाच्या जागेवर बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी जवळपास 17 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

मात्र प्रशासकीय इमारतीचे काम जवळपास 60 टक्के पूर्ण झाले असून आता निधी मिळत नसल्याने हे काम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडल्याने कराड नगरपालिकेच्या बैलबाजार रोडच्या इमारतीतुन तहसील कार्यालयाचे कामकाज चालत आहे.मात्र निधीच्या कमतरतेमुळे अजून किती दिवस पालिकेच्या इमारतीत तहसील कार्यालय राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts: