|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै यांना कला सन्मान पुरस्कार

ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै यांना कला सन्मान पुरस्कार 

प्रतिनिधी/ पणजी

ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण पै यांना प्रफुल्ला डहाणुकर फाऊंडेशनचा कला सन्मान पुरस्कार काल प्रदान करण्यात आला.

कला अकादमीत बुधवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अन्य बऱयाच कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले. प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनतर्फे ‘कलानंद 2017 ा साऊथ वेस्ट अवॉर्ड’ या कार्यक्रमाचा प्रारंभ पंडित सत्यशील देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. त्यांनी प्रारंभी राग तोडीमध्ये गणेशवंदना सादर केली. त्यानंतर आणखीन दोन राग सादर करून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली. तबलापटू दयेश कोसंबे यांनी त्यांना साथसंगत केली.

प्रसिध्द रंगकर्मी सौ. विजया मेहता यांची प्रफुल्ला डहाणूकर यांच्या काही आठवणी सांगतानाची 2015 साली झालेल्या पहिल्या कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. व्यासपीठावर यावेळी फाऊंडेशनचे ट्रस्टी दिलीप डहाणूकर, बांदेकर उद्योगसमूहाचे अध्यक्ष नाना बांदेकर, धेंपो उद्योगसमूहाचे यतीश धेंपो, चित्रकार जयश्री पैलवान, चित्रकार रवींद्र साळवे, गोव्यातील चित्रकार हनुमान कांबळी, किर्तीकुमार प्रभू आणि एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बरूण कुमार खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी देशभरातून 2,160 प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधुन 1260 चित्रकारांची निवड करण्यात आली, असे दिलीप डहाणूकर म्हणाले. प्रत्येक तैलचित्राचे परीक्षण करणे व गुण देणे खरोखरच कठीण काम होते. यावेळी वार्षिक पुस्तिका 2017 चे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयश्री पहेलवान यांचेही भाषण झाले. यानंतर नाना बांदेकर यांच्याहस्ते लक्ष्मण पै यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यानंतर अन्य चित्रकारांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात गोव्यातील चित्रकारामधून म्हापसा येथील स्वप्नेश हरिश्चंद्र वायंगणकर यांनी ‘प्रिन्ट मेकिंग’मधून ऑल इंडिया सिल्वर मॅडल तर पणजीतील सागर सुरेश नाईक मुळे यांना ‘इनस्टॉलेशन’मधून पश्चिम विभाग सिल्वर मॅडल प्राप्त झाले आहे. सुनिल धर्मा चावडीकर (हळदोणा), अमरीश शरद पार्सेकर (म्हापसा), वत्सला वसंत हेदे (मडगाव), ग्लेन जेजूस फर्नांडिस (मडगाव), विदेश नारायण नाईक (मडगाव), विजय मोहन भंडारे (मुरगाव), कौशल्या रामदास गडेकर (मुरगाव), राजेंद्र अमर म्हार्दोळकर (पणजी), चंदन दामू नाईक गावकर (पणजी), सिद्धार्थ प्रदीप गायतोंडे (पणजी), हर्षा जवाहर मांदूरकर (पणजी), दत्तप्रसाद गुरुदास नाईक (पणजी), प्रितेश कमलाकांत नाईक (पणजी), राजेश पांडुरंग साळगावकर (पणजी), राजेंद्र अमर मार्दोळकर (पणजी), नंदिनी रमेश रायकर (पणजी), दिप्तेश दिलीप वेर्णेकर (पणजी) यांना गोवा राज्य मेरिट ऍवार्ड तर ज्योती धवल मेहता यांना महिला गोवा राज्य ऍवार्ड (पणजी), सिटी ऍवार्ड फॉर पणजी मधून रोहित सत्यवान भोसले या चित्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Related posts: