पाळोळे येथील कार्निव्हल मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात शेळी, भाटपाल, आगोंद, चावडीसारख्या भागांमध्ये अजूनही इंत्रुजचे मांड असून काही भागांमध्ये मांडावर दिवा लावून आणि पारंपरिक वाद्ये वाजवून कार्निव्हल साजरा करण्याची परंपरा चालू आहे. त्यात भर म्हणून काणकोणचे माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी पाळोळे युनायटेड ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कार्निव्हल मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
होवरे येथून सुरू झालेल्या या कार्निव्हल मिरवणुकीत वाद्यवृंदाच्या साथीने स्थानिक युवक आणि युवती जशा सहभागी झाल्या त्याचप्रमाणे पाळोळे किनाऱयावरील परदेशी पर्यटक देखील मोठय़ा संख्येने सहभागी झाले. ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. किनाऱयापर्यंत ही मिरवणूक गेल्यानंतर पाळोळेच्या क्रीडा क्लबजवळ सांगता करण्यात आली. रिबलो यांनी हा पारंपरिक उत्सव साजरा करणे असेच चालू ठेवण्यासाठी स्थानिक लोकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.