|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुरगाव बंदरात पर्यटकांसाठी टॅक्सी काऊन्टरची सोय

मुरगाव बंदरात पर्यटकांसाठी टॅक्सी काऊन्टरची सोय 

प्रतिनिधी/ वास्को

मुरगाव बंदरातील प्रवासी जहाजांच्या धक्क्यानजीक एमपीटीतर्फे टॅक्सी काऊन्टरची सोय करण्यात आली आहे. या टॅक्सी काऊन्टरचे उद्घाटन बुधवारी सकाळी एमपीटीचे अध्यक्ष आय. जेयाकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटक जहाजांची संख्या वाढत असल्याचे सांगून दरवर्षी शंभर पर्यटक जहाजे बंदरात आणण्याचे लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती आय. जेयाकुमार यांनी दिली.

एमपीटीतर्फे मुरगाव बंदरात मागच्या तीन वर्षांपासून स्वातंत्र प्रवासी धक्का उपलब्ध करण्यात आलेला आहे. या धक्क्यावर दरवर्षी पर्यटन हंगामात आंतराष्ट्रीय स्तरावरील पंचवीस ते तीस पर्यटक जहाजांचे आगमन होत असते. या पर्यटकांच्या सोयीसाठी बंदराच्या बाहेर पर्यटक टॅक्सी उपलब्ध असतात. परंतु पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी टॅक्सी काऊन्टर उघडण्यात आला नव्हता. एमपीटीने आता ही सोयसुध्दा उपलब्ध केलेली आहे. धक्क्याजवळच हा टॅक्सी काऊन्टर उघडण्यात आलेला असून या काऊन्टरवर टॅक्सीची मागणी केल्यानंतर पर्यटक टॅक्सी धक्क्यानजीक येऊन या पर्यटकांना घेऊन जातील.

या काऊन्टरचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना एमपीटीचे अध्यक्ष आय. जेयाकुमार यांनी पर्यटकांची चांगली सोय व्हावी या हेतूनच हा टॅक्सी काऊन्टर उपलब्ध करण्यात आल्याचे सांगून टॅक्सी काऊन्टरवरून पर्यटकांना चांगली सेवा देण्याच्या बाबतीत आपण कमी पडणार नाही यांची दखल टॅक्सी व्यवसायीकांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. पर्यटक जहाजांव्दारे गोव्यात येणाऱया विदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत असते. यंदा आतापर्यंत 29 पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झालेली आहेत. यंदाचा पर्यटन हंगाम संपेपर्यंत आणखी 11 पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात येतील. यंदा पर्यटक जहाजांची संख्या 40 होणार असली तरी येत्या पाच वर्षांत मुरगाव बंदरात दाखल होणाऱया आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक जहाजांची संख्या 100 पर्यंत व्हावी असे लक्ष्य ठेवण्यात आलेले असल्याचे आय. जेयाकुमार यांनी सांगितले.

बंदर विस्तार आणि खासगीकरणावर जनसुनावणी होणार

मुरगाव बंदरातील एका धक्क्याचे विस्तारीकरण होणार असून वेदांता कंपनीलाही खासगीकरण्याच्या माध्यमातून एक धक्का देण्यात येणार आहे. तसेच बंदरातील गाळ काढण्याचे ठप्प झालेले काम पुन्हा करण्यात येणार असून या सर्व कामांच्याबाबतीत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी वास्कोत येत्या दि. 20, 24 व 27 रोजी जनसुनावणी घेण्यात येईल अशी माहिती एमपीटीचे अध्यक्ष आय. जेयाकुमार यांनी दिली. मुरगाव बंदरातून हाताळण्यात येणाऱया कोळशाची वाहतुक केवळ दहा टक्केच रस्ता मार्गे होत असते. इतर 90 टक्के वाहतुक रेल मार्गे होत असते असे सांगून आय. जेयाकुमार यांनी रस्ता मार्गे होणारे कोळसा प्रदुषण रोखण्यासाठी एमपीटीतर्फे अधिक उपायोजना करण्यात येतील असे स्पष्ट केले.

Related posts: