|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खूनप्रकरणी पाडळी येथील तिघांना जन्मठेप

खूनप्रकरणी पाडळी येथील तिघांना जन्मठेप 

प्रतिनिधी /सातारा :

सातारारोड-पाडळी (ता.कोरेगाव) येथील खंडू बबन चव्हाण यांना जातीवाचक शिविगाळ करत त्यांचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी त्याच गावातील नितीन जयसिंग फाळके, दिलीप संपत फाळके, दत्तु उर्फ अशोक श्रीरंग फाळके या तिघांना गुरुवारी जन्मठेपेची आणि एकत्रित 54 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच ऍट्रासिटीअंतर्गत सहा महिन्याची शिक्षा सुनावली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारारोड-पाडळी (ता. कोरेगाव) येथे खंडू बबन चव्हाण हे कुटुंबियांसमवेत राहण्यास होते. त्यांचा गावातील नितीन जयसिंग फाळके, दिलीप संपत फाळके, दत्तु उर्फ अशोक श्रीरंग फाळके यांच्याशी वाद होता. दि. 6 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी खंडू चव्हाण हे घरातून बाहेर गेले. दुपारी 4 वाजता पाडळी-सातारा रस्त्यावर नवीन ग्रामपंचायती इमारतीसमोर खंडू चव्हाण यांना मारहाण झाली. रात्रीचे दहा वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. दुसऱया दिवशी सकाळी शोध आणि चौकशी करत असतानाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांना दुपारच्या सुमारास काही जणांनी खंडू चव्हाण यांना ग्रामपंचायत इमारतीसमोरील मोकळ्या जागेत मारहाण केल्याचे व ते त्याच ठिकाणी जखमी अवस्थेत पडून होते, अशी माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली असता खंडू चव्हाण हे मिळून आले नाहीत. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तडवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. याठिकाणी त्यांना खंडू चव्हाण हे उपचारासाठी आले होते. याठिकाणाहून नंतर त्यांना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात नेल्याची माहिती देण्यात आली.

यानुसार त्यांचे कुटुंबिय सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी त्यांना खंडू चव्हाण यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. लाथा बुक्क्यांनी पोटात मारहाण झाल्याने त्यांच्या आतडय़ांना गंभीर स्वरुपाची इजा झाल्याची माहिती याठिकाणच्या डॉक्टरांनी दिली. यानतंर जखमी खंडू चव्हाण यांना उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी शस्त्रक्रिया झाल्यानंतर खंडू चव्हाण हे शुध्दीवर आले. याठिकाणी त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती भाऊ रणजित यांना दिली. यानंतर त्याचठिकाणी खंडू चव्हाण यांचा जवाब नोंदवून घेण्यात आला. हा जबाब नंतरच्या काळात कोरेगाव पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला. उपचार सुरु असताना खंडू चव्हाण यांचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी सांगितलेल्या तसेच त्यांनी नोंदविलेल्या जवाबानुसार मृत खंडू चव्हाण यांचे बंधू रणजित बबन चव्हाण (रा. सातारारोड-पाडळी) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात नितीन जयसिंग फाळके, दिलीप संपत फाळके, दत्तु उर्फ अशोक चव्हाण या तिघांच्या विरोधात खूनाचा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा नोंदवला.

Related posts: