|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बेळगावच्या महापौर बांद्याच्या स्नुषा

बेळगावच्या महापौर बांद्याच्या स्नुषा 

सावंतवाडीकोकण विशेषतः सिंधुदुर्गवासीयांनी मुंबई, पुणे महानगरपालिकेत महापौर, उपमहापौरपदापर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे नातेही असेच गहिरे आहे. बेळगावमध्ये महापालिकेवर नेहमीच मराठी भाषिकांचा वरचष्मा राहिला आहे. अलिकडेच बेळगावच्या महापौरपदी बांदा-सावंतवाडी गावच्या स्नुषा संज्योत बांदेकर निवडून आल्या आहेत. बांदेकर यांचे माहेर कोकणातील रायगड-महाड येथे आहे. बेळगाव महापालिकेत सत्ताधारी गटनेतेपदीही सलग तीन वर्षे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली सावरवाडचे सुपुत्र पंढरी परब आहेत.

महापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिक संज्योत बांदेकर तर उपमहापौरपदी नागेश मंदोळकर यांची निवड झाली. सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांचा मराठी भाषिक महापौर व उपमहापौर बसविण्यात मौलिक वाटा आहे.

बेळगावच्या महापौर श्रीमती बांदेकर यांनी सांगितले की, आमचे मूळ गाव बांदा आहे. माझे सासरे, पतीचे कुलदैवत बांदा रवळनाथ देवस्थान आहे. पती कामानिमित्त बेळगावात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आम्ही बेळगाववासीय झालो. गेली कित्येक वर्षे आम्ही बेळगावात आहोत. बांद्यात दरवर्षी न चुकता कुलदेवतेच्या भेटीला येतो. माझे बालपण माहेरला महाड येथे झाले. कोकणचा ठसा बेळगावात महानगरपालिकेत उमटला, याचा आनंद काही वेगळाच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकले. लवकरच बांद्यात देवदर्शनासाठी येणार आहे.

मराठी भाषिक सत्ताधारी गटनेते पंढरी परब म्हणाले, बेळगाव महानगरपालिकेत आम्ही सावंतवाडीचे दोघेजण आहोत. आता महापौरपदी सिंधुदुर्गची सून विराजमान झाल्याचा आनंद आहे. बेळगाव रहिवासी हितवर्धक संघाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सिंधुदुर्ग व बेळगावात विविध उपक्रम राबवितो. बेळगाव महापौरपदी आतापर्यंत 22 मराठी भाषिक विराजमान झाले आहेत. प्रथमच कोकणची कन्या अन् सुनेला महापौरपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.

Related posts: