|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » मुंबई-गोवा प्रवासात बहरणारं प्रेम

मुंबई-गोवा प्रवासात बहरणारं प्रेम 

स्वभावातले एकही टोक जुळत नसूनही जेव्हा दोघांची मनं जुळतात तेव्हा हमखास समजावं की ती दोघं एकमेकांमध्ये गुंतली आहेत. फक्त त्या गुंतण्याची जाणीव व्हावी लागते. ती झाली की प्रेमाचा अंकुर फुलायला वेळ लागत नाही. अनपेक्षितरित्या एका प्रवासात दोघांचं सोबत जाणं आणि तो प्रवास करता करता आयुष्याचाच प्रवास एकत्र करण्याचा विचार करणारं गुलाबी नातं जुळून येईल का ही कल्पनाच किती सुखावणारी असते. ‘प्रेम हे’ या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये श्री आणि श्वेता यांच्या प्रेमाच्या नात्याची हीच गंमत दिसणार आहे. झी युवावर, येत्या सोमवार 6 मार्च आणि मंगळवार 7 मार्चला रात्री 9 वाजता, मुंबई टू गोवा ही ‘प्रेम हे’ या मालिकेची नवीन गोष्ट पाहायला मिळेल.

श्री म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी, मनसोक्त जगणारा… प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा… प्रत्येक श्वासात निसर्ग भरून घेणारा… नेहमी स्वप्नात रमणारा… सतत चेहऱयावर स्मितहास्य, अगदी मुक्त मोकळय़ा आकाशासारखा… हॅपी गो लकी.  श्वेता म्हणजेच स्पफहा जोशी ही म्हणजे अगदी त्याच्या विरुद्ध… जेव्हापासून हातात पुस्तक आलंय ते आजपर्यंत कधी सुटलेच नाही. शालेय जीवनातही अभ्यास आणि त्याशिवाय काहीच केलं नाही. सतत ऑफिसची प्रेझेंटेशन्स, गॅझेटस, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप आणि मोबाईल हेच तिचे आयुष्य. श्वेता म्हणजे ऑनलाइन हे समीकरणच अगदी पक्कं. फोन स्वीच ऑफ किंवा लॅपटॉपचं चार्जिंग संपलं की श्वेताची अस्वस्थता तिच्या चेहऱयावर स्पष्ट दिसणार. आता या अशा दोन टोकाच्या स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा मुंबई ते गोवा एवढा मोठा प्रवास एकत्र करणार म्हणजे किती आणि कशी मजा येते ते या नव्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

श्रीच्या कॉलेजची ट्रिप गोव्याला निघालेली असते. पण, नेहमीप्रमाणे श्रीला उशीर होतो. आणि त्याची बस त्याला न घेताच निघून जाते. श्वेताही गोव्यालाच निघाली आहे. सोशल मीडिया मॅनेजर असलेली श्वेता विमानाने गोव्याला जाऊ शकत असतानाही केवळ प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी कार भाडय़ावर घेते. या प्रवासाला निघणार इतक्यात कार एजंटच्या विनंतीखातर श्रीला ती लिफ्ट द्यायचं मान्य करते पण तिच्या अटींवर… आता 10 ते 12 तासांचा हा प्रवास. एकीकडे मनमोकळा स्वच्छंदी श्री आणि दुसरीकडे कडक आणि कामात व्यग्र होऊन जाणाऱया श्वेताच्या अटी मान्य करतो की स्वत:च्या स्वभावानुसार प्रवास एन्जॉय करतो. मुंबई टू गोवा हा प्रवास हे दोघे पूर्ण करतात की प्रवास अर्धवट राहतो. आणि मुख्य म्हणजे श्री आणि श्वेता एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्यांच्या स्वभावातील विरोधाभास त्यांच्या वाटा वेगळं करतो की एकमेकांशी अव्यक्त राहतात हे या नव्या गोष्टींमध्ये कळणार आहे.