|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कासारवर्णे आरोग्यकेंद्रावर मोर्चा

कासारवर्णे आरोग्यकेंद्रावर मोर्चा 

प्रतिनिधी / मोरजी

पेडणे तालुक्यातील पत्रादेवी, तोरसे, हणखणे परिसरात सापडलेल्या मृत माकडामुळे या भागात माकडतापाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले. तरीही सरकारी पातळीवर सामसूम असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

या परिसरातील नागरिकांनी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ यांच्या नेतृत्वाखाली आज कासारवर्णेचे आरोग्य केंद्रावर सामुदायिक मोर्चा नेला आणि दोन दिवसांत लसीकरण न केल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. तसेच आरोग्य अधिकाऱयांना धारेवर धरले. यावेळी आरोग्याधिकारी विल्प्रेड मिरांडा यांनी सांगितले की मृत माकडाविषयी योग्य ती तपासणी करून पुणे येथे तपासणीसाठी पाठविला आहे. याविषयी वरिष्ठांकडून अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

अहवाल सकारात्मक : डॉ. योगेश नाईक

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश नाईक यांनी सांगितले की माकडाविषयीचा पुणे येथील अहवाल सकारात्मक असून तो आपल्याला शुक्रवारीच प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच आपण याबाबत कासारवर्णेच्या आरोग्याधिकाऱयांना कळवले असल्याचे सांगितले. वाळपई आरोग्य केंद्रातील माकडतापाच्या लसी पेडणे येथे उपलब्ध केल्या जातील.

आतापर्यंत मृत माकडांची संख्या बारावर पोहोचली

तुये आरोग्यकेंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. उत्तम राऊत देसाई म्हणाले की पेडणे तालुक्याच्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील जंगला अलीकडे मृत माकडे आडळली तरी जोपर्यंत यामागचे कारण समजत नाही तोपर्यंत निदान निश्चित करता येणार नाही. वैद्यकीय अधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेऊ.

आरोग्य खात्याने त्वरित निर्णय घ्यावा : बाबू आजगावकर

सध्या काजूचा मोसम असल्याने रानात अनेकजणांना जावे लागते. आरोग्याधिकाऱयांनी नागरकांच्या जीवाशी खेळू नये. एक अधिकारी पुण्याचा अहवाल आल्याचे सांगतो तर दुसऱयाला याची साधी माहितीही असू नये? यावरून सरकार किती संवेदनशील आहे याची प्रचिती येते असे बाबू आजगावकर म्हणाले.

माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग परब यांनीही आरोग्य खात्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

केवळ संपर्काने लागण होत नाही : डॉ. राऊत देसाई

माकडाच्या अंगावर असलेल्या रक्तपिपासू गोचिडीमुळे या रोगाचा प्रसार होतो. माकडाला चावलेली गोचीड चावली तरच प्रादुर्भाव होऊ शकतो. असे असले तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे डॉ. राऊत देसाई यांनी सांगितले.

Related posts: