|Thursday, November 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » उत्तर प्रदेशचा ‘मतसंग्राम’ आज संपणार

उत्तर प्रदेशचा ‘मतसंग्राम’ आज संपणार 

लखनौ / वृत्तसंस्था

सात टप्प्यांमध्ये विभागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पूर्ण होत आहे. या सातव्या टप्प्यात पूर्वांचल भागातील सात जिल्हय़ातील 40 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. वाराणसी, सोनभद्र, मिर्झापूर, जौनपूर, भदोई, गाझीपूर व चंदौली अशी या सात जिल्हय़ांची नावे आहेत. यातील सोनभद्र, मिर्झापूर आणि चंदौली हे जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असून त्यातील पाच विधानसभा मतदारसंघांवर साऱया देशाचे लक्ष आहे.

या टप्प्यातील मतदारांची संख्या साधारणतः 1 कोटी 41 लाख असून त्यातील 64.76 लाख महिला आहेत. एकंदर 14 हजार 458 मतदानयंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागांमध्ये अतिरिक्त पोलीस दलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 5 अशी आहे.

या चाळीस जागांपैकी भाजपने 32 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने 8 जागा अपना दल आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या दोन मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. सपने 31 जागांवर, काँग्रेसने 9 जागांवर, राष्ट्रीय लोकदलाने 21 जागांवर, बसपने 40 जागांवर तर राष्ट्रवादी काँगेसने 5 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सर्वाधिक 24 उमेदवारा वाराणसी छावणी मतदारसंघात असून सर्वात कमी 6 उमेदवार केराकट (आरक्षित) मतदारसंघात आहेत.

अखिलेश यादव सरकारमधील ओम प्रकाश, पारसनाथ यादव व अजय राय या टप्प्यात मतदारांना सामोरे जात आहेत. याशिवाय माजी खासदार धनंजय सिंग आणि सीमा सिंग आदी अन्य महत्वाचे उमेदवार आहेत.

मणीपूरमध्येही अखेरचा टप्पा

मणीपूर या ईशान्येकडील राज्यातील 28 मतदारसंघांमध्येही बुधवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री इबोबी सिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्यात सामना रंगणार आहे. मुख्य लढत भाजप आणि काँगेसमध्ये असल्याचा कयास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Related posts: