|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झेडपीच्या निवडीसाठी रस्सीखेच

झेडपीच्या निवडीसाठी रस्सीखेच 

प्रतिनिधी / सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नुकताच जाहीर केला आहे.  21 मार्चला छत्रपती शिवाजी सभागृहात दुपारी 2.30 वाजता या निवडी जाहीर होणार आहेत. त्यामुळे आत्तापासूनच हौसे, नवसे, गवसे यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून स्पर्धेत सुरस निर्माण केली आहे. त्यामुळे नेत्यांची पंचाईत वाढली आहे. तरीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, जावलीचे वसंतराव मानकुमरे, सातारचे शिवाजीराव चव्हाण, कराडचे मानसिंगराव जगदाळे व खटावचे सुरेंद्र गुदगे हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी पाटणचे राजेश पवार व खटावचे प्रदीप विधाते यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे.

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये 21 मार्च रोजी सकाळी 10 ते दु. 12 या वेळेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांच्याकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी अर्ज सादर करावयाचा आहे. दुपारी 2.20 ते 2.30 या वेळी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तर दु.2.31 मिनीटांनंतर आवश्यक वाटल्यास या पदासाठी मतदान घेण्यात येणार आहे.

अन्य तालुक्याला संधी मिळणार का?

अध्यक्षपद फलटण भागात दिले तर उपाध्यक्षपद पाटण तालुक्याला दिले जावे, असा कार्यकर्त्यांमध्ये सुर आहे. गेल्या 15 वर्षात गायत्रिदेवी पंतप्रतिनिधी (खटाव), हेमलता ननावरे (वाई), भाग्यश्री भाग्यवंत (खटाव), ज्योती जाधव (महाबळेश्वर), अरुणादेवी पिसाळ (वाई), माणिकराव सोनलवकर (फलटण), सुभाष नरळे (माण) हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आता अन्य तालुक्याला संधी मिळणार का? अशीही चर्चा रंगु लागली आहे.

तसेच उपाध्यक्ष पदाबाबत विक्रमबाबा पाटणकर (पाटण), बाळासाहेब भिलारे (महाबळेश्वर),नितीन भरगुडे- पाटील (खंडाळा), चंद्रकांत जाधव (सातारा), संजीवराजे निंबाळकर (फलटण) व रवि साळुंखे (सातारा) यांनी उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे कराड, जावली व कोरेगाव या तालुक्यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळालेले नाही. तर पाटण तालुक्यालाही 10 वर्षात अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळालेले नाही.

11 व 12 मार्च रोजी राष्ट्रवादी भवनात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला सर्व आमदार व पक्षाच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

निवडी राष्ट्रवादी मनमोकळेपणाने करणार

जिल्हा परिषदेतील शिक्षण व अर्थ, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा विविध समित्यांच्या सभापती व सदस्यनिवडी या 1 एप्रिल रोजी होणार आहेत. यावेळच्या निवडी राष्ट्रवादीला मनमोकळेपणाने करण्यात येणार आहे. यापुर्वी उदयनराजे गटातील रवि साळुंखे,ा शिवाजीराव शिंदे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीला खिंडीत पकडून वांरवार त्रास दिला होता. तो त्रास यंदा होऊ नये म्हणून मतदारांनीच राष्ट्रवादीला बहुमत देऊन एकहाती सत्ता दिलेली आहे.

जिह्याचा निर्णय जिह्यातच रहावा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडीचा कार्यक्रम 21 मार्च रोजी होणार आहे. तत्पूर्वी अध्यक्षपदाच्या रेसमध्ये चारचौघांची नावे चवीने चर्चिली जात आहेत. मात्र, यामध्ये अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जबाबदारी न सोपवता, जिह्यातील निर्णय जिह्यातच घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिह्यातील कार्यकर्त्यांमधून केली गेली आहे.

Related posts: