|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीत माकडे मरण्याचे सत्र सुरूच

सत्तरीत माकडे मरण्याचे सत्र सुरूच 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीत माकडे मरण्याचे सत्र सुरूच असल्याने येणाऱया काळात माकडतापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी हिवरे लोकवस्तीपासून अवघ्या अंतरावर मरण पावलेल्या माकडाला जाळल्यानंतर कोदाळे भागातही आणखी तीन माकडे मृतावस्थेत आढळली. म्हादई अभयारण्याच्या वन कर्मचाऱयांनी त्यांची विल्हेवाट लावली आहे. माकडतापाच्या नियंत्रणासाठी सरकारने दोन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. आपत्कालीन समितीतील सदस्यांचा समन्वय नाही. सरकारने लक्ष घालून ही समिती कार्यान्वित करावी व आपत्कालीन कक्षालाही उर्जित करावे, अशी मागणी होत आहे.

सत्तरी व पेडणे तालुक्यात माकडतापाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. माकडतापाने शिरोली गावाला वेढा घातला आहे. या गावात माकडतापाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. हा भाग सांखळी सामाजिक रुग्णालयाच्या कक्षेत येतो, मात्र या रुग्णालयात अद्याप माकडतापाबाबत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. मनिपॉल संस्थेतर्फे वाळपई रुग्णालयात रक्त तपासणीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. सांखळी रुग्णालयात तशी व्यवस्था नसल्याने येथील रुग्णांना रक्ततपासणीचा लाभ मिळत नाही. अशा प्रकारची व्यवस्था सांखळीतही सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सध्या शिरोली भागातील दोन रुग्ण वाळपई सामाजिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, सत्तरीच्या विविध भागात सध्या मृत माकडे आढळून येत असल्याने येथील ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. वाळपई सामाजिक रुग्णालयात सध्या 2500 माकडताप प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्या असून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.

Related posts: