|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घोटगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी 145 कोटीचा प्रस्ताव

घोटगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी 145 कोटीचा प्रस्ताव 

कणकवली : घोटगे-सोनवडे रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असताना आता या रस्त्याच्या कामासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी सिंधुदुर्गातील पावणेसहा किमीसाठी 55 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तर कोल्हापूर हद्दीत वन जमिनीत बांधण्यात येणाऱया उड्डाण पुलासाठी 70 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांसाठी बजेटमधे तरतूद झाल्यानंतर साधारणतः पुढील वर्षी या घाटरस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणार आहे.

या घाटरस्त्याच्या कामाचे वन जमिनीतील सीमांकनाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्गच्या हद्दीतील सीमांकन पूर्ण करण्यात आले असून वन जमिनीत येणाऱया झाडांचे पर्यायी वनीकरण व रस्त्यांतर्गत येत असलेली झाडे तोडणे त्या अनुषंगिक कामाचे 3 कोटी 34 लाख 68 हजार 958 रुपये रक्कम भरणा करण्यात आले आहेत. या रस्ताकामात वन विभागाच्या अटींचा डोंगर समोर उभा असताना त्याची टप्प्याटप्प्याने पूर्तता केली जात आहे.

बजेटमध्ये तरतूद होणार

वन विभागाच्या अखत्यारितील अनेक बाबी पूर्ण करीत असताना वन विभागाच्या ताब्यातील जागेमधील रस्त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करणे गरजेचे होते. ही तरतूद अद्याप झालेली नव्हती. वाईल्ड लाईफकडून या घाटरस्त्याची पाहणी करून झाल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्हय़ाच्या हद्दीत 1600 मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून वावर असणाऱया वन्यजीवांच्या हालचालींना बाधा येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूरमधील उड्डाण पुलासाठी 70 कोटींचा प्रस्ताव

कोल्हापूर हद्दीतील 1600 मीटरच्या उड्डाणपुलासाठी 70 कोटींचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव करण्यात आला आहे. तो प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात यावर काय निर्णय होतो, ते पाहणे महत्वाचे असणार आहे. या बजेटमधील मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर या उड्डाण पुलाचे अंदाजपत्रक व त्या अनुषंगिक बाबींवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डेहराडूणहून आलेल्या वाईल्ड लाईफच्या पथकाने कोल्हापूर हद्दीतील वन जमिनीत उड्डाणपूल बंधण्याची शिफारस केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिंधुदुर्गातील कामासाठी 55 कोटी

सिंधुदुर्गच्या हद्दीत 5.75 किमी अंतरासाठी अर्थसंकल्पात 55 कोटींच्या तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत या रस्त्याच्या कामाचा बहुतांश टप्पा वन विभागाच्या अखत्यारितील बाबींवर आधारित असल्याने या रस्त्याच्या कामासाठी अद्याप तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, वाईल्ड लाईफकडून याबाबत पाहणीअंती अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्या सूचनांप्रमाणे वन विभागाच्या जागेतील कामे प्रस्तावित करण्यात येत आहेत.

बजेटमधील मंजुरीनंतर पुढील टप्पा

वन विभागाकडून या घाटरस्त्याबाबत वन जमिनीच्या अनुषंगाने जे 34 मुद्दे उपस्थित केले होते, त्यातील अनेक मुद्यांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आता बजेटमध्ये या रस्त्याच्या निधीची तरतूद झाली, की या कामाचा महत्वपूर्ण टप्पा मार्गी लागणार आहे. त्यानंतर या कामाचे अंदाजपत्रक व त्याची मंजुरी आदी प्रशासकीय कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.