|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तर प्रदेशात 60 टक्के, मणीपूरमध्ये 84 टक्के मतदान

उत्तर प्रदेशात 60 टक्के, मणीपूरमध्ये 84 टक्के मतदान 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात 60.03 टक्के मतदान झाले आहे. तसेच मणीपूर विधानसभेच्या दुसऱया आणि अखेरच्या टप्प्यात विक्रमी 84 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याबरोबरच पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया संपुष्टात आली असून आता निकालांची उत्सुकता आहे. मतमोजणी येत्या शनिवारी होणार आहे.

उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्यात एकंदर 40 जागांवर मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याची टक्केवारी 60.03 टक्के इतकी होती. तथापि, अनेक मतदान केंद्रांवर पाच नंतरही मतदारांच्या रांगा असल्याने अंतिम टक्केवारी यापेक्षा काहीशी अधिक असेल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. सातही टप्प्यांमध्ये मिळून एकंदर 60 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले आहे. या टप्प्यात सर्वच पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी जोरदार प्रचार केला होता. मोदीही वाराणसीत तीन दिवस वास्तव्यास होते.

दोन्ही राज्यांमधील अखेरच्या टप्प्यांमधील मतदान शांततेत पार पडले. काही किरकोळ घटना वगळता कोठेही मतदानात अडथळा आला नाही. दोन्ही राज्यांच्या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होती. इतरत्र ती 5 वाजेपर्यंत होती.

शनिवारी मतमोजणी

गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि उत्तर प्रदेश या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी शनिवारी होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व राज्यांमधील चित्र स्पष्ट झालेले असेल. सर्व राज्यांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये तीव्र चुरस असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने विशेष महत्वाची आहे.

गुरूवारी मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष

सर्व राज्यांमधील मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झ्टि पोल) निष्कर्ष गुरूवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर प्रसारित करावेत, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. उत्तर प्रदेशातील एक आणि उत्तराखंडमधील एक विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरूवारी मतदान होत आहे. तेथे उमेदवारांचे निधन झाल्याने मतदान पुढे ढकलण्यात आले होते. ते पार पडल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल घोषित केले जाणार आहेत.