|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वार्थापोटी गोपीचंद पडळकरांकडून खोटे आरोप

स्वार्थापोटी गोपीचंद पडळकरांकडून खोटे आरोप 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडीतील श्री.सिध्दनाथ पाणी वापर संस्थेवर गोपीचंद पडळकर यांनी केलेले आरोप निराधार, खोटे आहेत. दिशाभुलीचे राजकारण करणाऱयांचा पाणीपट्टीमध्ये घोटाळय़ाचा आरोप प्रसिध्दीचा खटाटोप आहे. संस्थेने नियमानुसार शासनाकडे पैसे भरले असून त्याचे पुरावे आहेत. स्थापनेपासून 56लाखांची उलाढाल झालेल्या संस्थेवर कोटय़ावधींच्या घोटाळय़ाचा आरोप करणाऱया गोपीचंद पडळकर यांच्याच उद्योगाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील यांनी केली.

सिध्दनाथ पाणी वापर संस्थेवर पाणीपट्टी वसुलीमध्ये घोटाळय़ाचा आरोप भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी केला होता. बुधवारी संस्थेचे मार्गदर्शक भारत पाटील, संचालक बंडोपंत देशमुख, आनंदराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष हणमंतराव करांडे, प्रदिप पाटील, आबासो पाटील, सिताराम लिगाडे, राजेंद्र चव्हाण, सचिव अरूण पाटील, अशोक लवटे यांच्या उपस्थितीतील पत्रकार परिषदेत आरोपांना उत्तर देत संस्थेला बदनाम करण्याचा उद्योग सहन करणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

गोपीचंद पडळकर यांनी स्वत: गोरगरीब शेतकऱयांच्या दुधाचे पैसे बुडवुन फसवणुक केली आहे. शेतकऱयांचा कळवळा दाखवायचा आणि शेतकऱयांच्या दुधाचे पैसे बुडवुन खाल्लेला पडळकरांचा दुध संघ गेला कुठे? असा सवाल भारत पाटील यांनी केला. पडळकर हे सातत्याने मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांची नावे घेवुन प्रसिध्दीचा खटाटोप करत आहेत. आता आम्हीच पारदर्शक कामाचा आग्रह धरणाऱया मुख्यमंत्री महोदयांनी पडळकरांच्या सर्व उद्योगाची व जमविलेल्या संपत्तीची चौकशीची मागणी करत करणार आहोत. देशमुख बंधुंच्या मदतीने सत्तेत पोहचलेल्या पडळकर यांनी आजपर्यंत समाजात तेढ निर्माण करून पोळी भाजुन घेतली आहे.

सिध्दनाथ पाणी वापर संस्थेने 2013 ते 2017 या कालावधीत शासनाकडे 32 लाख 47हजार 402रूपये भरले आहेत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. 2004ची स्थापना असलेल्या संस्थेने 2017 या कालावधीपर्यंत 56लाख 42हजार 738 रूपये वसुल केले आहेत. पैकी 37लाख 88हजार 535रूपये शासनाकडे भरले आहेत. तर 3 लाख 34हजार 809रूपये पाणीपट्टीचा भरणा सध्या करणार आहोत. 14 वर्षात कामगारांचे पगार, पाणी पुरवठा सुरळीत करणे, कॅनॉलची देखभाल दुरूस्ती करणे, तलावावरील झाडे काढणे अशी कामे संस्थेने केली आहेत. संस्थेच्या 2 लाख 70हजार रूपयांच्या ठेवी आहेत. तर तर संस्थेकडे 3 लाखांची शिल्लक आहे.

आमच्या संस्थेचा कारभार पारदर्शक असताना खोटेनाटे कोटय़ावधींच्या घोटाळय़ाचा आरोप करून पडळकरांना काय साध्य करायचे आहे? असा सवालही भारत पाटील यांनी केला. लोकांची दिशाभुल करणाऱया पडळकरांनी जनतेच्या विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. समाजात तेढ निर्माण करून स्वार्थ साधणाऱया पडळकरांनी पाण्याबाबतचे दिशाभुलीचे वक्तव्य केले आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करून पोळी भाजणाऱया पडळकरांनी किती ठिकाणी कष्ट करून टोलेजंग संपत्ती जमविली, असा आरोपही भारत पाटील यांनी केला.

सिध्दनाथ पाणी वापर संस्थेवरील आरोप म्हणजे फुकट पाण्याचा आग्रह धरणाऱयांची सुपारी घेवुन केलेले काम आहे. पडळकरांचे जमिन व्यवहारातील सहभागाची व बेनामी जमविलेल्या संपत्तीची आणि आमचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री महोदयांकडे करणार आहोत. लोकांच्या भावनेशी खेळुन खोटेनाटे आरोप करणाऱया पडळकरांची आजपर्यंतची वाटचाल संशयास्पद आहे आणि जनतेने हे ओळखले आहे, असा आरोपही भारत पाटील यांनी केला.

शासनाच्या मोफत पाण्याचे पैसे संस्थेने घेतल्याचा आरोप करणाऱयांनी आमच्यावरील आरोप सिध्द करून दाखवावेत, असे सांगत कार्यक्षेत्रात नसलेल्या लोकांनाही पाणी देण्याचे काम आम्ही केल्याचे भारत पाटील व संस्थेच्या पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले. लोकप्रियतेसाठी काहीही आरोप करण्याची पडळकर यांची पध्दत असून ते आणखी किती दिवस असले उद्योग सुरू ठेवणार, असा सवाल करत भारत पाटील व सिध्दनाथ पाणी वापर संस्थेने पाणीपट्टीची आकडेवारी सादर केली.

Related posts: