|Saturday, March 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अन्नातून विषबाधा झाल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अन्नातून विषबाधा झाल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

प्रतिनिधी /बेंगळूर :

अन्नातून विषबाधा झाल्याने तीन विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमकूर जिह्याच्या चिक्कनायकनहळ्ळी तालुक्यातील हुळीयार येथे घडली आहे. बुधवारी रात्री भोजनानंतर ही घटना घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. विद्यावारीधी इंटरनॅशनल रेसिडेंसियल स्कूलमध्ये घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी शाळेचे मालक, माजी आमदार किरण कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुधवारी रात्री वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चपाती, बिटरूटची भाजी, डाळ आणि भात हे पदार्थ भोजनासाठी वाढण्यात आले. भोजनानंतर काही मिनिटातच चार विद्यार्थी अत्यवस्थ झाले. काही वेळातच तिघांचा मृत्यू झाला. दहावी इयत्तेतील  आकांक्षा पल्लक्की, शांतमूर्ती आणि आठवीतील श्रेयस अशी विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आणखी एक विद्यार्थी सुदर्शन आणि सुरक्षा कर्मचारी रमेश या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर तुमकूर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहे.

रात्री भोजनावेळी जेवण कडू झाल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली होती. तर काहींनी विनातक्रार भोजन केले. अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थ्यांना नजिकच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर तातडीने तुमकूरला नेऊन अधिक उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, इस्पितळात नेत असतानाच तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रकृती चिंताजनक असलेल्या सुदर्शन नामक विद्यार्थ्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. भोजनानंतर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने घटनेमागे संशयाचे गुढ वलय निर्माण झाले आहेत.

Related posts: