|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इराणकडून क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण

इराणकडून क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण 

वृत्तसंस्था / तेहरान

इराणच्या ‘रिव्हाल्यूनेशनरी गार्ड’ कडून बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी ठरल्याचा दावा येथील निम-सरकारी वृत्तमाध्यम फार्सने केला आहे.

हा दावा करताना वृत्तमाध्यमाने रिव्हॉल्यूनेशनरी गार्डच्या हवाई विभागप्रमुखांच्या एका मुलाखतीत केलेल्या विधानाचा हवाला दिला आहे. परीक्षणावेळी क्षेपणास्त्राने 250 किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याचे जनरल अमीर हाजीझादेह यांच्याकडून या मुलाखतीदरम्यान सांगण्यात आले. गत आठवडय़ात ही चाचणी पार पडली असून बॅलेस्टीक क्षेपणास्त्राचे समुद्रातून प्रक्षेपण करण्यात आल्याचे फार्सकडून सांगण्यात आले.

300 किमी पर्यंत मारक क्षमता असणाऱया या क्षेपणास्त्राचे नाव ‘हॉर्मूझ 2’  असून तरंगत्या लक्ष्याचाही अचूक वेध घेण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचे फार्स कडून सांगण्यात आले. याव्यतिरिक्मत क्षेपणास्त्राविषयी अन्य कोणतीही माहिती  निम-सरकारी वृत्तसंस्थेकडून पुरवण्यात आली नाही. तर अन्य एका निम-सरकारी इराणने यापूर्वीच उपग्रह प्रक्षेपणासारख्या नागरी उपयोगाकरीता बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात यश मिळवले होते. परंतु अमेरिकेकडून देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या प्रक्षेपणाविषयी योजना रद्द करण्यात आल्याचे हाजीझादेह यांनी अन्य एका निम-सरकारी वृत्तमाध्यमाच्या मुलाखतीदरम्यान सांगितले. अमेरिकेचे हे धोरण अपमानास्पद असल्याची टीकाही  हाजीझादेह यांनी केली.

निर्बंध झुगारले

या महिन्याच्या आरंभीच इराणी क्षेपाणस्त्र विकास कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवणारी आस्थापने आणि व्यक्तींवर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतरही मध्यवर्ती वाळवंटीप्रदेशात पार पडलेल्या कवायतीदरम्यान इराणच्या लष्कराकडून विविध अत्याधुनीक अग्निबाणांचे सफल प्रक्षेपण करण्यात आल्याचा दावाही इराणच्या वृत्तमाध्यमांकडून गत महिन्यात करण्यात आला होता.