|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीकरांचा सांभाळकर्ता श्रीदेव भैरीबुवा!

रत्नागिरीकरांचा सांभाळकर्ता श्रीदेव भैरीबुवा! 

शिमगोत्सव होतोय जल्लोषात साजरा

 

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीचे बारावाडय़ांचे ग्रामदैवत ‘श्री देव भैरी’ म्हणजे समस्त रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान! भैरीबुवावर भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे. भैरीबुवाचे सर्व सणउत्सव परंपरागतरित्या रितीरिवाजाप्रमाणे मोठय़ा भक्तीभावाने साजरे केले जातात. ट्रस्टी, मानकरी, गावकरी या उत्सवासाठी एकदिलाने सज्ज होतात आणि भैरीबुवाचा उत्सव गुण्यागोविंदाने जल्लोषात साजरा होतो. भैरीबुवाच्या वार्षिक सणउत्सवात सर्वात महत्तम सण म्हणजे शिमगोत्सव! या शिमगोत्सवासाठी बाऱयावाडय़ांचे गावकरी एक होतात आणि भैरीबुवाची होळी उभी करतात. श्री देव भैरीबुवाची पालखी शिमगोत्सवात गावभेटीला निघते, लहानथोर श्री भैरीबुवाचे पालखीतील सजलेले देखणे दरारापूर्ण रूप पाहून सारेच धन्य होतात. सुवासिनी खणानारळाने ओटी भरतात आणि मनःपूर्वक हात जोडून श्रीदेव भैरीपुढे आपल्या मनोकामना मांडतात. भैरीबुवाचा महिमा अपरंपार असून तो रत्नागिरीकरांवर कृपाछत्र ठेवून सर्वांचा सांभाळ करत असल्याची प्रत्येकाचीच ठाम भावना आहे. श्री भैरीबुवा म्हणजे रत्नागिरीकरांची आन, मान, शान आहे. श्री देव भैरीबुवाच्या शिमगोत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली आहे. ढोलताशांच्या गजराने रत्नागिरी परिसर निनादून निघाला आहे. कै. अरूअप्पा जोशी यांच्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱया मुन्ना सुर्वे यांनी शिमगोत्सवासाठी भक्तगणांना निमंत्रित केले आहे. शिमगोत्सव एकोप्याने, उत्साहात, शांततेत आणि भक्तीभावान साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

भैरीबुवा रत्नागिरीतच नव्हे, तर सातासमुद्रापार कामधंद्यानिमित्त गेलेल्या रत्नागिरीकरावर कृपादृष्टी ठेवून असतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या बाहेरील जगतातसुद्धा अतिव आदराने या स्वयंभू देवस्थानाकडे पाहिले जाते. संकट काळातील तारणहार, कृपाकटाक्षातून जीवन सुसह्य करणारा, सांसारिक अडचणींचे गाऱहाणे त्याच्यासमोर मांडले की, निश्चिंत होणाऱया भाविकांना श्रीदेव भैरीबुवा आपला, अगदी जवळचा वाटतो.

भैरीबुवाच्या प्रांगणात गेल्यानंतर प्रसन्नतेचा वास त्याठिकाणी असल्याची जाणीव होते आणि मन भक्तीभावाने भरून जाते. पायावर पाणी घेऊन आपण जेव्हा देवळाच्या पायऱया चढतो तेव्हा श्री भैरीबुवाची त्याठिकाणचा वास निश्चित जाणवतो…घंटेचा नाद केल्यावर आपण भैरीबुवाच्या मुर्तीसमोर गेल्यानंतर डोळे आपोआप मिटतात आणि मन त्याच्या चरणी अर्पण होते. अगरबत्ती, नारळ वाहून, गाऱहाणे मांडून साष्टांग दंडवत घालून जेव्हा आपण देवळातून बाहेर पडतो, तेव्हा एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळालेली असते. यातूनच आपल्या दुःख, अडचणी दूर करायला आपल्यास ताकद मिळते, हे निश्चित!

‘बा धन्या तू भैरीच्या खऱया काजरघाटीपासून ते बालेकिल्लेपर्यंतच्या जनतेला सुखी ठेव’ असे गाऱहाण्यात सांगितले जाते. त्या काजरघाटीपासून बालेकिल्लेपर्यंतच्या हद्दीपर्यंत श्रीदेव भैरीची अधिसत्ता असून रत्नागिरीच्या सुमारे चार चौरस मैलाचे भागावर त्यांची विशेष कृपादृष्टी आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जनता त्याला पूर्वापार रत्नागिरीचा राजा म्हणून संबोधिते.

असा हा राजा एकदा ब्रिटिश राजवटीमध्ये पालखीत बसून ढोल ताशांच्या मिरवणुकीने शिमगा, रंगपंचमीच्या दिवशी राईतून शहर पोलीस ठाण्याकडून धनजीनाक्याकडे जात असताना रत्नागिरीच्या ब्रिटिश कलेक्टरने आणि डी.एस.पी.ने त्याला हटकले आणि मिरवणुकीवर बंदी घातली. परंतु त्यांच्या या कृत्याची त्यांना काही दिवसांतच वाईट प्रचिती येऊन त्यांच्यावर संकटे कोसळली. म्हणून ते या भैरी राजाला शरण गेले आणि त्यांनी काढलेला बंदीहुकूम रद्द करुन पुढील शिमग्यापासून त्यांनी सरकार दरबारचा मान म्हणून या भैरीराजाची पालखी थेट पोलीस स्टेशनच्या दारात नेऊन त्याची पूजा अर्चा केली. तेथपासून शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सरकार दरबारचा मान स्वीकारणेची प्रथा या राजाने आजतागायत चालू ठेवलेली आहे. तसेच झाडगाव सानेवर पोलीस यंत्रणेतर्फे बंदुकीची हवेत फैरी झाडून श्रीदेव भैरीला सलामी दिली जाते.

फाल्गुन पौर्णिमेची रात्र म्हणजे शिमग्याची रात्र. भैरीराजाला रुपे लावणेचा दिवस. भैरीबुवा सजेल आणि पालखीत विराजमान होऊन रात्री 12 वाजता वाजत गाजत मंदिरातून बाहेर पडेल. गाव होळीसाठी गावकरी, मानकरी आणि विश्वस्त मंडळींमध्ये सामील होईल आणि शिमग्याची सर्व कार्ये पार पाडल्यानंतर रंग पंचमीच्या दिवशी रात्री 12 च्या आत हा राजा पुन्हा आपले पालखीसह आपल्या मंदिरात जाऊन विराजमान होईल.