|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » करुळला सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

करुळला सव्वादोन लाखाचे दागिने लंपास 

फोंडाघाटकणकवली तालुक्यात घरफोडय़ांचे सत्र रोखण्यात पोलिसांना अद्यापही यश मिळालेले नाही. गेल्या काही दिवसांतील घरफोडय़ांच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी भर दिवसा तालुक्यातील करुळ इंदिरा वसाहत येथील सचिन केशव तांबे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. कपाटात ठेवलेल्या सुमारे 99 ग्रॅम वजनाच्या 2 लाख 24 हजार 700 रुपयांच्या दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला. नेहमीप्रमाणे पोलिसांनी श्वान पथक, पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केले. चोऱयांचे सत्र वाढले असताना चोरटय़ांचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याने तालुक्यात घबराट पसरली आहे.

या चोरीबाबत अंजली सचिन तांबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही चोरी शनिवारी दुपारी 11.30 ते 1.15 वा. च्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादीनुसार करुळ इंदिरा वसाहत येथे सचिन तांबे यांचे घर आहे. तांबे हे उंबर्डे येथे आरोग्य विभागात कामाला आहेत. ते सकाळी कामावर गेले होते. त्यानंतर घरी त्यांच्या पत्नी अंजली व मुलगा होता. दुपारी 11.15 वाजण्याच्या सुमारास अंजली या मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला घेऊन कणकवली येथे डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्या दुपारी 1.15 वा. च्या सुमारास घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. तोडलेले कुलूप तेथीलच बाजूच्या खिडकीजवळ ठेवण्यात आले होते.

घरी परतलेल्या अंजली यांना दरवाजा उघडा दिसल्याने घाबरून त्या घरात गेल्या असता, त्यांना घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. त्यातील कपडे व इतर सामान बेडवर अस्ताव्यस्त पसरून टाकल्याचे आढळले. म्हणून त्यांनी कपाटात पाहिले असता आतील सोन्याच्या दागिन्यांचे बॉक्स बेडवर उघडून टाकलेले आढळून आले. या घटनेमुळे अंजली यांना धक्काच बसला. त्यांनी ही माहिती पती सचिन यांना कळविली.

सचिन तांबे यांच्या घरातील लोखंडी कपाटातील प्लास्टिकच्या डब्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातले सोन्याचे तीन जोड, सोन्याच्या तीन अंगठय़ा, लहान मुलाची सोन्याची चेन व लक्ष्मी हार असे मिळून 99 ग्रॅमचे 2 लाख 24 हजार 700 चे सोन्याचे दागिने चोरटय़ांने लंपास केले होते. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, फोंडाघाट दूरक्षेत्राचे पोलीस दयानंद चव्हाण, भगवान नागरगोजे, कणकवलीचे उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान घराभोवती फिरून फोंडाघाट राज्यमार्गापर्यंत येऊन तेथील माळरानावर घुटमळले. कपाटावरील ठसेही घेण्यात आले.

Related posts: