|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » कर्नाटकला नमवून बडोदा उपांत्य फेरीत वृत्तसंस्था

कर्नाटकला नमवून बडोदा उपांत्य फेरीत वृत्तसंस्था 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रविवारी येथील फिरोजशहा कोटला मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बडोदा संघाने कर्नाटकाचा 25 चेंडू बाकी ठेवून 7 गडय़ांनी पराभव करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

या सामन्यात बडोदा संघाने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजी दिली. कर्नाटकाचा डाव 48.5 षटकांत 233 धावा आटोपला. त्यानंतर बडोदा संघाने 45.5 षटकांत 3 बाद 234 धावा जमवित विजयासह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

कर्नाटकाच्या डावात देशपांडेने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 59 चेंडूत 54, अग्रवालने 43 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 40, समर्थने 67 चेंडूत 2 चौकारांसह 44, उथप्पाने 35 चेंडूत 3 चौकारांसह 24, जोशी व सूचित यांनी प्रत्येकी 18 धावा जमविल्या. कर्नाटकच्या डावात 4 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बडोदा संघातर्फे पांडय़ाने 32 धावांत 3 तर पठाण, सेठ, मेरवाई, स्वप्निल सिंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बडोदा संघातील सलामीचा फलंदाज देवधरने 98 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 78, पांडय़ाने 79 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 70, हुडाने 39 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 34, युसूफ पठाणने 1 चौकारांसह नाबाद 10 तर वाघमोडेने 48 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा केल्या. देवधर आणि पांडय़ा यांनी दुसऱया गडय़ासाठी 92 धावांची भागिदारी केली. बडोदा संघाच्या डावामध्ये 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. कर्नाटकातर्फे अरविंदने 2 तर सूचितने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक 48.5 षटकांत सर्वबाद 233, बडोदा 45.5 षटकांत 3 बाद 234.