|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » प्रशिक्षक अनिल कुंबळेंना लवकरच संघ संचालकपदी बढती?

प्रशिक्षक अनिल कुंबळेंना लवकरच संघ संचालकपदी बढती? 

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपद शक्य, इंग्रजी वृत्तपत्राचा दावा, मंडळाकडून मात्र दुजोरा नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी कर्णधार, दिग्गज फिरकीपटू व विद्यमान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना लवकरच भारताच्या संघ संचालकपदी बढती मिळेल व राहुल द्रविडकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवले जाईल, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.

अनिल कुंबळे जून 2016 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत आहेत तर द्रविड भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने कसोटीमध्ये अव्वलमानांकन प्राप्त केले असून 2016 मध्ये संघाने अगदी एकही कसोटी गमावली नाही. कुंबळेंच्या प्रशिक्षणाखाली भारताने वेस्ट इंडीजला नमवले व न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश यांच्याविरोधात सातत्याने यश प्राप्त केले.

12SPO-10-Rahul Dravid

दुसरीकडे, द्रविड प्रशिक्षकपदी रुजू झाल्यानंतर भारताच्या युवा संघाने कमालीचे यश संपादन केले. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही या संघाने धडक मारली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढताना दि. 2 जानेवारी रोजी दिलेल्या निकालाप्रमाणे सध्या मंडळाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. याच प्रशासकांनी वरील बदल अंमलात आणणे रास्त ठरेल का, यावर लक्ष केंद्रित केले असल्याचा दावा सदर वृत्तपत्राने केला आहे.

या वृत्तानुसार, कुंबळेंना संघ संचालकपदी तर द्रविडना मुख्य प्रशिक्षकपदी बढती मिळेल, असा दावा केला गेला आहे. अलीकडेच बेंगळुरातील कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 75 धावांनी नमवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी बीसीसीआयच्या प्रशासक समितीची भेट घेतली व या बैठकीत प्रशासकांनी कुंबळेंना वरिष्ठ संघ, अ संघ, कनिष्ठ व महिलांच्या संघाबाबत सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली, असेही या वृत्तात नमूद आहे. सध्या सुरु असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका कुंबळे यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक या नात्याने शेवटची असेल आणि दि. 14 एप्रिल रोजी त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाईल, असा दावाही यातून केला गेला आहे.

बीसीसीआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने या शक्यतेला दुजोरा दिला. शिवाय, याबाबतचे प्रस्ताव सुरु करण्याची तयारी यापूर्वीच सुरु झाली असल्याची पुष्टी दिली. कुंबळे व द्रविड यांना बढती देण्याबरोबरच क्रिकेट सल्लागार समितीची पुनर्स्थापना करण्यावर प्रशासकांचा भर आहे, असे या पदाधिकाऱयांचे मत आहे. अर्थात, आणखी एका वृत्तानुसार, प्रशासक समितीतील सदस्य डायना एडलजी यांनी मात्र यात काहीही तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

 

Related posts: