|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’!

सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’! 

अति कमी वजनाच्या 72 शिशुंना महिनाभरात नवीसंजीवनी

सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी

अतिशय कमी वजन असलेल्या नवजात शिशुसाठीचा सर्वसोयीनींयुक्त असा अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रूग्णालयात तयार करण्यात आला आहे.  महिनाभरात 1500 ग्रॅम वजन असलेल्या 72 शिशुंना नवसंजीवनी देण्याची कामगिरी या अतिदक्षता विभागाने बजावली आहे. आरोग्य उपसंचालकांनी या विभागाचे कौतुक करत कार्पोरेट दर्जाच्या या विभागाने राज्यातील अन्य रुग्णालयांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद केले.

जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये सध्या वैद्यकीय अधिकाऱयाच्या कमतरतेची समस्या आहे मात्र आहे त्या मनुष्यबळावर अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  बदलती जीवनशैली व अन्य कारणांमुळे अलीकडे जन्मजात कमी वजनाच्या शिशूंचे प्रमाण वाढत आहे. अशा कमी वजनाच्या शिशुंना काचेच्या पेटीत म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवले जाते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय यापूर्वीही ही सुविधा होती मात्र जागेअभावी या विभागाची क्षमता कमी होती. आता ही क्षमता 10 ची करण्यात आली आहे. एकावेळी 10 मुले ठेवता येतात. यासाठी बालरोग तज्ञ डॉ. दिलीप मोरे यांच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर नवजात शिशु विभागाची  स्वतंत्र इमारत आहे. याठिकाणी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पूर्ण कामकाज चालते.

शासकीय रूग्णालयात फेब्रुवारी महिन्यात तब्बल 204 प्रसुत्या झाल्या. यामध्ये 72 अर्भकांचे वजन हे केवळ 1500 ते 2000 ग्रॅम इतकेच होते. अशा अर्भकांना वेळेत औषधोपचार व कृत्रिम श्वासोच्छवासची आवश्यकता असते. अशा बालकांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. याचठिकाणी त्या अर्भकाच्या प्रकृतीनुसार देखभाल केली जाते. रत्नागिरी सिव्हीलमधील हा नवजात शिशु विभागामुळे सर्वसामान्य मातांना एक मोठा दिलासा ठरला आहे. 3 महिन्यापर्यंत अर्भकावर शासकीय रूग्णालयामार्फत पूर्ण मोफत उपचार केले जातात.

 खाजगी रूग्णालयात प्रसुतीचा खर्च अधिक असतो आणि बाळाचे वजन कमी असेल तर त्याचा खर्च वेगळा असतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नसतो. एका दिवसाचे 5 ते 7 हजार फी अतिदक्षता विभागासाठी आकारली जाते. मात्र, सिव्हीलमध्ये हे सगळे उपचार मोफत होत आहे. त्यामुळे रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटलमधील नवजात शिशु विभाग राज्यातील सर्वात अव्वल विभाग ठरला आहे.

 

आदर्श सुविधा उपलब्धः डॉ.आरसुळकर

रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील नवजात शिशु विभागाकडे संपूर्ण राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जाते. यासाठी शासनाने निधी त्वरीत मंजूर केला होता. खाजगी हॉस्पीटलमधून अर्भक या अतिदक्षता विभागात उपचारासाठी पाठविले जातात. कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे.

Related posts: