|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकरसह आठजणांचा आज शपथविधी

पर्रीकरसह आठजणांचा आज शपथविधी 

प्रतिनिधी/ पणजी

संरक्षणमंत्री मनोहर परींकर यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. आज मंगळवारी सायंकाळी 5.15 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पर्रीकरांबरोबरच उपमुख्यमंत्री म्हणून मगो नेते सुदिन ढवळीकर तसेच गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई इत्यादींसह आठ जणांचा शपथग्रहण सोहळा होईल. या शपथग्रहण सोहळय़ास भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

आजपासून गोव्यात पुन्हा एकदा मनोहर पर्रीकर यांची राजवट सुरू होत आहे. सायंकाळी 5.15 वाजता राजभवनच्या हिरवळीवर आयोजित समारोहात राज्यपाल सौ. मृदुला सिन्हा या पर्रीकर मंत्रीमंडळातील आठ सदस्यांना गुप्ततेची शपथ देतील. मनोहर पर्रीकर आज चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

पर्रीकर 28 वे मुख्यमंत्री

आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे मनोहर पर्रीकर हे जरी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असले तरी ते राज्याचे 28 वे मुख्यमंत्री ठरतात. केंद्रशासित प्रदेशापूर्वी भाऊसाहेब बांदोडकर तीन वेळा, शशिकलाताई काकोडकर दोन वेळा, तर प्रतापसिंह राणे दोन वेळा मुख्यमंत्री बनले. गोव्याला घटक राज्य 1987 मध्ये मिळाले. त्यानंतर प्रतापसिंह राणे यांचे सरकार संपुष्टात आले व पुन्हा तेच सरकार दुसऱया दिवशी अस्तित्वात येऊन ते घटक राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. प्रतापसिंह राणे हे घटक राज्याच्या काळात पाच वेळा मुख्यमंत्री झाले. चर्चिल आलेमाव 13 दिवसांसाठी तर रवी नाईक दोन वेळा मुख्यमंत्री बनले. 1994 मध्ये ते केवळ सात दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले. लुईझिन फालेरो दोन वेळा मुख्यमंत्री बनले. फ्रांसिस्क सार्दिन हेदेखील काही दिवस मुख्यमंत्री बनले. पर्रीकर आतापर्यंत तीन वेळा व आज शापथ घेणारे ते गोव्याचे 28 वे मुख्यमंत्री बनतील व मुख्यमंत्रीपदाची ते चौथ्यांदा शपथ घेतील.

गोव्यात 2012 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आणण्यात मनोहर पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा होता. 2014 मध्ये केंद्रात भाजपचे पूर्ण ताकदीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकरांना राष्ट्रीय राजकारणात नेले आणि त्यांना संरक्षणमंत्रीपद दिले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये त्यांना राज्यसभेचे सदस्य करून घेतले. मात्र दिल्लीतील राजकारणात पर्रीकरांचे मन रमले नाही. सव्वा दोन वर्षांनंतर पुन्हा दीड महिन्यांपूर्वी गोव्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यात पर्रीकरांनी आपली सारी शक्ती पणाला लावली. तरीदेखील राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री पराभूत झाले. भाजपला 13 जणांचे बळ प्राप्त झाले. मगो, गोवा फॉरवर्ड व अपक्षांच्या सहाय्याने विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक आकडा पर्रीकरांनी पार केल्याने राज्यपालांनी त्यांना आमंत्रण दिले आहे.

सुदिन ढवळीकर उपमुख्यमंत्री

आजच्या मंत्रिमंडळात भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शपथ घेतील. तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

प्रसाद गावकरही भाजप आघाडीत

दरम्यान, पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आणखी थोडे बळ आले. सोमवारी सांगेचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद गावकर यांनी आपला पाठिंबा पर्रीकरांना दिला. तशा आशयाचे पत्रही गावकर यांनी राज्यपालांना सादर केले. त्यामुळे भाजप सरकारचे बहुमत 22 पर्यंत पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनीदेखील आपण भाजप सरकारला पाठिंबा देण्यावर विचार करतोय असे सांगितले आहे. त्यामुळे पर्रीकरांना देणाऱया पाठिंब्याच्या संख्योत आणखी एकाने वाढ होईल व आकडा 23 पर्यंत जाऊन पोहोचेल. हा आकडा बहुमतापेक्षा दोनने अधिक आहे.

आज आठ मंत्र्यांचा शपथग्रहण?

भाजपचे मंत्री ठरेनात

मनोहर पर्रीकर यांनी दुपारी भाजप मुख्यालयात सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. बैठकीत मंगळवारी सायंकाळी शपथग्रहण सोहळा होईल, अशी माहिती दिली. मात्र कोण मंत्री होतील आदीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आमदार फार उत्सुकतेने वाट पाहत होते. सत्तेसाठी निर्माण झालेले कडबोळे भाजपच्या आमदारांनाच महागात गेले. मंत्रीपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु तब्बल सात महत्त्वाची मंत्रीपदे सरकारला पाठिंबा देणाऱयांना गेली व भाजपच्या वाटय़ाला केवळ चार मंत्रीपदे आली आहेत व एक मुख्यमंत्रीपद. यामुळे सरकार घडत असले तरी त्याचा लाभ मात्र इतरांना अधिक होणार आहे. भाजपच्या अनेकांना आमदार म्हणूनच रहावे लागणार आहे. या अशा कठीण प्रसंगाने मनोहर पर्रीकर यांना आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री ठरविता येत नाही.

भाजपच्या गाभा समितीची बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली. बैठकीत मावळते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह सर्वजण उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फ्रांसिस्क डिसोझा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला हे समजू शकले नाही. मात्र आज पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी मनोहर पर्रीकर चर्चा करतील. शहा हे दुपारी गोव्यात येत आहेत. तसेच राजनाथ सिंग व नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा करून नंतर भाजपचे मंत्री ठरतील, असा अंदाज आहे.

Related posts: