|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हाळू नाईक पॅनलची घोषणा

म्हाळू नाईक पॅनलची घोषणा 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव अर्बंन कॉ-ओपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दि. 19 रोजी होत असून काल म्हाळू नाईक पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनलमध्ये म्हाळू नाईक यांच्या सहीत एकूण सहा उमेदवार आहेत. मडगावचे उद्योजक सुनील के. नाईक हे या पॅनलचे समन्वयक आहे.

म्हाळू नाईक यांच्या पॅनेलमध्ये बँकेचे माजी चेअरमन ऍड. नारायण एम. देसाई,  बँकेचे माजी संचालक गुरूदास एल. कामत, मडगावचे माजी नगरसेवक गुरूनाथ जी. लाड, म्हापशाचे उद्योजक प्रदीप घाडी आमोणकर व उद्योजक प्रितीदास जी. नाईक यांचा समावेश आहे.

बँकेचे विद्यमान चेअरमन रमाकांत आंगले यांनी मडगाव बँकेची वाताहात केली असून बँक 2013 पासून आज पर्यंत तोटय़ात चालत आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात हा तोटा 14.5 कोटी रूपयांच्या घरात गेल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत करण्यात आला. बँकेने जो वार्षिक ताळेबंद सादर केला आहे. त्यात बँक तोटय़ात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बँकेला सावरण्याची आत्ता नितांत गरज आहे. आत्ता जर बँक सावरली नाही तर या बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यमान संचालक मंडळाने बँकेत मनमानी कारभार चालविला आहे. बँकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून कर्जाच्या वसुलीकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बँकेच्या भागधारकांना गेल्या कित्येक वर्षापासूनचा लाभाश वितरित करण्यात आलेला नाही. बँकेच्या सर्व साधारण सभा देखील गांभीर्याने घेतल्या जात नाही. सर्व साधारण सभेत इतिअहवाल देखील व्यवस्थित सादर केला जात नाही. भागधारकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी दिली जात नाही. समस्या मांडली तरी योग्य उत्तरे दिली जात नाही. सर्व साधारण सभा अवघ्या 15 ते 20 मिनिटात आटोपती घेतली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

विद्यमान संचालकांच्या नेतृत्वाखाली बँकेला कोणतेच भवितव्य नाही. त्यामुळे सर्व भागधारकांनी रविवार दि. 19 रोजी मोठय़ा संख्येने बाहेर पडून मडगाव अर्बंन बँकेत परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन म्हाळू नाईक पॅनलेचे समन्वयक सुनील के. नाईक यांनी केले आहे. बँकेचे सुमारे 54000 भागधारक असून त्यांच्याच हातात आत्ता बँकेचे भवितव्य आहे. विद्यमान संचालक मंडळाने बँकेचा लाभ आपल्या मित्र मंडळीला तसेच नातेवाईकांनाच प्राप्त करून दिल्याचा आरोप देखील श्री. नाईक यांनी केला.

Related posts: