|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सर्वाधिक लांब भुयार होणार खुले

सर्वाधिक लांब भुयार होणार खुले 

जम्मू-श्रीनगरदरम्यानचे अंतर घटणार

वृत्तसंस्था/ चनैनी

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बनलेले देशाचे सर्वाधिक लांब भुयार लवकरच सामान्य वाहतुकीसाठी खुले होणार आहे, यावरील चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 9.2 किलोमीटर लांब या भुयाराची निर्मिती 23 मे 2011 साली सुरू झाली होती. हे दुहेरी भुयार 286 किलोमीटर लांब 4 पदरी महामार्गाचा भाग आहे, ज्यासाठी 3720 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे भुयार समुद्रसपाटीपासून 1200 मीटरच्या उंचीवर स्थित आहे. हे भारतातील पहिले असे भुयार असेल, जे जागतिक ‘एकीकृत भुयार नियंत्रण प्रणाली’ने परिपूर्ण असेल.

यात हवा, अग्निशमन, सिग्न, संपर्क आणि इलेक्ट्रिकल प्रणाली सर्वकाही स्वयंचलित असणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीरची दोन महत्त्वाची शहरे जम्मू आणि श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ अडीच तासांनी कमी होणार आहे.

हे भुयार खुले झाल्यानंतर चनैनी आणि नाशरी दरम्यानचे अंतर 41 किलोमीटरवरून 10.9 किलोमीटरवर येणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. हे भुयार वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यानंतर एनएच-1 वर हिमवर्षावामुळे होणाऱया कोंडीपासून दिलासा मिळेल.

या भुयाराच्या वापरासाठी छोटय़ा वाहनांना एका दिशेला जाण्यासाठी 55 रुपये आणि ये-जाच्या प्रवासासाठी 85 रुपये तर एक महिन्यासाठी 1870 रुपये द्यावे लागतील. तर मोठे वाहन म्हणजेच मिनी बसला एका दिशेला जाण्यासाटी 90 रुपये आणि ये-जाच्या प्रवासासाठी 135 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. बस आणि ट्रकसाठी हे शुल्क एका दिशेच्या प्रवासाठी 190 रुपये आणि 285 रुपये दोन्ही बाजूला जाण्यासाठी भरावे लागेल. या भुयारात एकूण 124 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.