|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उद्याच्या बैठकीकडे नजरा

उद्याच्या बैठकीकडे नजरा 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ठरवण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने दि. 20 रोजी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीकडे सगळय़ा जिह्याच्या नजरा लागल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी दावा केला आहे. त्यात फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, जावलीतून वसंतराव मानकुमरे, पाटणमधून राजेश पवार, खटावमधून सुरेंद्र गुदगे, खंडाळय़ातून उदय कबुले, कराडमधून मानसिंगराव जगदाळे, कोरेगावमधून जयवंत भोसले यानी मागणी केली आहे. मात्र या शेवटच्या बैठकीत नेते मंडळीकडून काय निती अवलंबणार याचे आराखडे मांडले जात आहेत.

राष्ट्रवादीने सत्ता जिंकली असली तरीही अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे यापदासाठी अनेकांनी नेत्यांकडे आपल्यालाच अध्यक्षपद असावे अशी मागणी केली आहे. या मागणीचा जोर एवढा आहे की काही सदस्यांनी तर आम्हाला कोणतेही पद द्या पण द्या, असाच हिया पुरवला आहे. त्यामुळे दि. 20 रोजीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हेच प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांची मते जाणून घेणार आहेत. हा अध्यक्ष कसा असेल?, त्यांना सभापतीपद दिल्यावर राष्ट्रवादीची बेरीज होईल की वजाबाकी, याची चाचपणी करण्यात येणार आहे.

तत्पूर्वीच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्यालाच मिळावे यासाठी अनेकांनी आपली इच्छा नेत्यांकडे प्रकट केली आहे. परंतु त्यामध्ये कोण यशस्वी ठरते हे दि. 20 च्या बैठकीनंतरच समजेल अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, याच बैठकीकडे सगळय़ा जिह्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.