|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 6 महिन्यांनी पाकशी चर्चा

6 महिन्यांनी पाकशी चर्चा 

सिंधू आयोगाची आज बैठक : भारताची भूमिका स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्थायी सिंधू आयोगाची (पीआयसी) बैठक सोमवारपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुरू होणार आहे. यात भारताचे 10 सदस्यीय शिष्टमंडळ भाग घेईल. हे शिष्टमंडळ रविवारी इस्लामाबादसाठी रवाना झाले. बैठकीत भारत आणि पाकदरम्यान 57 वर्षे जुन्या सिंधू जल करारावर चर्चा होईल. भारत या करारांतर्गत मिळालेल्या अधिकारांवर कोणतीही तडजोड करणार नाही असे केंद्र सरकारने आधीच  स्पष्ट केले आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या शासकीय पातळीवर चर्चा होईल.

18 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकशी कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आता चर्चा होणार असली तरीही पीआयसी बैठकीच्या अजेंडय़ाला अंतिम रुप देणे अजूनही शिल्लक आहे. भारतीय शिष्टमंडळात सिंधू जलआयुक्त पी.के. सक्सेना, विदेश मंत्रालयाचे अधिकारी आणि तत्रज्ञ सामील आहेत.

भारताची भूमिका

भारताने नेहमीच पाकिस्तानसोबत चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे. आम्ही करारांतर्गत चाललेल्या प्रकल्पांवर पाकच्या चिंता दूर करू, परंतु आपल्या हितांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. भारताने नेहमीच अशा बैठकांमध्ये अपेक्षांसह सहभाग घेतला आहे. बैठकीचा अजेंडा निश्चित होण्यास याआधी देखील विलंब झाला आहे, परंतु मुद्दे सोडविण्यात आले आहेत असे सरकारने स्पष्ट केले.

प्रकल्पांवर यशस्वी चर्चा

7 वर्षांपूर्वी उरी-2 आणि चुटक जलविद्युत प्रकल्पांवर पाकच्या चिंता त्याच्यासोबत चर्चेनेच दूर करण्यात आल्या होत्या. पाकने बारामुल्लाच्या 240 मेगावॅटच्या उरी-2 आणि कारगिलच्या 44 मेगावॅटच्या चुटक प्रकल्पावर आक्षेप घेतला होता. या प्रकल्पांमुळे करारांतर्गत आपल्या हिस्स्याच्या पाण्याला अडथळा होईल असा दावा पाकिस्तानने केला होता. परंतु मे 2010 मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पाकने आपले आक्षेप मागे घेतले होते. यामुळे प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला होता.

आता 5 प्रकल्पांवर आक्षेप

वर्तमान काळात भारताच्या 5 इतर जलविद्युत प्रकल्पांवर पाकने चिंता व्यक्त केली आहे. यात सिंधू नदी खोऱयातील पाकल दुल (1000 मेगावॅट), रातले (850 मेगावॅट), मियार (120 मेगावॅट) आणि लोअर कालनई (48 मेगावॅट) प्रकल्प सामील आहेत. या प्रकल्पांमुळे कराराचे उल्लंघन होत असल्याचे पाकचे म्हणणे आहे.