|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » युवा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

युवा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचे अनावरण 

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

फीफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले असून ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, असा विश्वास स्पर्धा आयोजकांनी दिला. सदर स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोबर दरम्यान भारतातील सहा शहरामध्ये होणार आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रातील ही तिसऱया क्रमांकाची मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. युवा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या लोगो चे (शुभंकर) अनावरण केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय फुटबॉल फेडरेशनला फीफाकडून या भव्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले. दरम्यान ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. भारत हा प्रचंड मोठा देश असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी प्राथमिक पूर्वतयारीच्या टप्प्यामध्ये अनेक अडथळे आले पण स्पर्धां आयोजकांनी या सम्स्यावर मात केली असून ही स्पर्धा भव्य प्रमाणात यशस्वी केली जाईल, असा विश्वास फीफाचे प्रमुख जेमी येर्झा यांनी व्यक्त केला. फीफा अध्यक्ष येर्झा आणि त्यांच्या पथकाचे नवी दिल्लीत आगमन होणार असून या पथकाचा 27 मार्चपर्यंत भारतात मुक्काम असून हे पथक विविध ठिकाणच्या फुटबॉल केंद्रांना भेट देणार आहे.