|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » 2 लाख रूपयांहून अधिक रोख व्यवहारांवर दंड होणार

2 लाख रूपयांहून अधिक रोख व्यवहारांवर दंड होणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दोन लाख रूपयांहून अधिक रकमेचा रोख व्यवहार केल्यास त्यावर 100 टक्के, अर्थात व्यवहाराच्या रकमेइतका दंड आकारण्याची सरकारची योजना आहे. यापूर्वी ही रक्कम 3 लाख असल्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, काळय़ा पैशावर अधिक प्रभावी पद्धतीने चाप बसवायचा असेल तर ही मर्यादा आणखी कमी करून 2 लाखांवर आणावी असा सरकारचा विचार आहे. 

महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ही माहिती मंगळवारी दिली. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 3 लाख रूपयांवरील रोख व्यवहारांवर दंड आकारण्याची योजना मांडण्यात आली होती. मात्र आता सरकार यासंबंधीचा सुधारणा प्रस्ताव मांडणार आहे. आता ही मर्यादा 2 लाख करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाला येत्या एक आठवडय़ात संसदेची संमती मिळेल आणि 1 एप्रिलपासून ही तरतूद अंमलात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोठय़ा रोखधारकांवर लक्ष ठेवणार

मोठय़ा प्रमाणावर बेहिशेबी रोख रक्कम असणारे लोक चैनीसाठी ती रोखीनेच खर्च करतात. यापुढे या व्यवहारांवर आणि अशा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. निश्चलनीकरणानंतर आता नव्या नोटा बँकांमधून मुबलक प्रमाणात मिळू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा बेहिशेबी पैशाची निर्मिती सुरू होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी प्रथमपासूनच सावधानता बाळगण्याचा इशारा सरकारच्या विविध आर्थिक विभागांना देण्यात आला आहे. महागडे दागिने, हिरे व त्यांची आभूषणे, किमती घडय़ाळे, भपकेबाज मोटारी यांची खरेदी रोख रक्कम देऊन करणाऱयांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

 

Related posts: