|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » भांडवली बाजारात वर्षातील विक्रमी घसरण

भांडवली बाजारात वर्षातील विक्रमी घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 318, एनएसईचा निफ्टी 91 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

आंतरराष्ट्रीय पातळीवरून खराब संकेत मिळाल्याने घरगुती बाजारात दबाव दिसून आला. सलग तिसऱया सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी घसरत बंद झाले. निफ्टी 9030 आणि सेन्सेक्स 29,200 च्या खालीपर्यंत घसरले. एका वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 318 अंशाने घसरत 29,168 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 91 अंशाने घसरत 9,030 वर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही विक्रीचे वर्चस्व होते. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.25 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

वाहन, बँकिंग, एफएमसीजी, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आणि ऊर्जा समभागात सर्वात जास्त विक्री दिसून आली. बँक निफ्टी 1.1 टक्क्यांनी घसरत 20,781 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्के, वाहन निर्देशांक 1.6 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.7 टक्के आणि धातू निर्देशांक 1.3 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 2 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 1.1 टक्के आणि ऊर्जा समभागात 1.1 टक्यांनी घसरण झाली. मात्र रिअल्टी समभागात तेजी दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

एचसीएल टेक, ल्यूपिन, सिप्ला, सन फार्मा, बीपीसीएल, विप्रो आणि डॉ. रेड्डीज लॅब 1.6-0.15 टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल, टाटा मोटर्स, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को आणि बजाज ऑटो 3.3-2 टक्क्यांनी कमजोर झाले.

मिडकॅप समभागात टायटन, युनियन बँक, इंडियाबुल्स आणि जेएसडब्ल्यू स्टील 4-2.9 टक्क्यांनी घसरत बंद झाले. स्मॉलकॅप समभागात नितीन फायर, टुरिझम फायनान्स, स्टील एक्स्चेंज, जस्ट डायल आणि ए2झेड इन्फ्रा 7.25-5.1 टक्क्यांनी घसरले. 

सकाळच्या सत्रात युरोपियन बाजारात घसरण आली होती. आशियाई बाजार 2 टक्क्यांनी घसरत बंद झाले.