|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोमियोविरोधी पथक उत्तरप्रदेशात सक्रीय

रोमियोविरोधी पथक उत्तरप्रदेशात सक्रीय 

योगी सरकारकडून आश्वासनाची पूर्तता

वृत्तसंस्था /  लखनौ

योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्याच्या दोन दिवसांमध्ये रोमियोविरोधी पथकाची स्थापना केली आहे. भाजपने आपल्या घोषणापत्रात याविषयीचे आश्वासन दिले होते. महिला, विशेषकरून शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी होणारी छेडछाड रोखण्याच्या दिशेने हे पथक प्रभावीपणे काम करेल असा पक्षाचा दावा आहे. राज्यभरात छेडछाडीच्या घटनांमध्ये सामील युवकांच्या पालकांना बोलावून पुन्हा अशी कृती केल्यास थेट तुरुंगात टाकण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

राज्याचे पहिले रोमियोविरोधी पथक मंगळवारी मेरठमध्ये दिसून आले. पहिल्याच दिवशी शाळा, महाविद्यालये, पानपट्टीच्या दुकानांजवळ दिसून येणाऱया युवकांची पथकाकडून चौकशी करण्यात आली. नंतर त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या कृत्यांची माहिती दिल्यावरच सोडण्यात आले. या पथकाचा उद्देश छेडछाड रोखणे आणि मुलींची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे.

पथकात 3 ते 4 सदस्य

मेरठ जिह्याच्या प्रत्येक पोलीस स्थानकात एक रोमियोविरोधी पथक बनले आहे. यात 3 ते 4 सदस्य सामील आहेत. ज्या भागांमध्ये लोकसंख्या अधिक आहे, तेथे पथक आणि त्याच्या सदस्यांची संख्या अधिक असू शकते. मेरठबरोबरच लखनौमध्ये देखील रोमियोविरोधी पथक सक्रीय असून शहरातील महाविद्यालयांबाहेर उभे किंवा संशयास्पद व्यक्तींची चौकशी त्याच्याकडून करण्यात आली. या पथकाबाबत वाद निर्माण झाला असून अनेकांनी कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे.

अवैध कत्तलखाने बंद करण्याचा आदेश

अवैध कत्तलखाने बंद करण्याचा आदेश योगी आदित्यनाथ यांनी पोलीस तसेच प्रशासनाच्या अधिकाऱयांना बुधवारी दिला. सूत्रानुसार योगींनी गायींच्या तस्करीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. याविषयीच्या बैठकीत पोलीस महासंचालक जावेद अहमद, मुख्य गृह सचिव देवाशिष पांडा आणि मुख्य सचिव राहुल भटनागर उपस्थित होते. याचदरम्यान अलीगढमधून 60 गायींसह 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तर हाथरस येथे मांसविक्रीच्या दुकानांना पेटवून देण्यात आल्याची घटना घडली.