ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

अमेरिकेत हय़ूस्टन येथे घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी/ मुंबई
आपल्या मर्मभेदी अग्रलेखांद्वारे मराठी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात मोठा दरारा निर्माण करणारे ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाचे माजी संपादक व व्यासंगी लेखक गोविंद तळवलकर (वय 91) यांचे बुधवारी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे निधन झाले. तळवलकर हे गेले काही दिवस आजारी होते. मात्र तरीही त्यांचे वाचन-लेखन अखंड सुरू होते. निवफत्तीनंतर गेली अनेक वर्षे ते आपल्या मुलीकडे अमेरिकेत वास्तव्य करून होते.
तळवलकर यांचा जन्म 22 जुलै 1925 ला डोंबिवली येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. प्रारंभी ‘नवभारत’ मासिक व नंतर ‘लोकसत्ता’ येथे त्यांनी प्रारंभिक पत्रकारिता केली. लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्याच काळात एम. एन रॉय यांच्या मानवतावादाने प्रभावित झालेल्या लक्ष्मणशास्त्राr जोशी, यशवंतराव चव्हाण इत्यादींच्या वर्तुळात ते ओढले गेले. मात्र, कोणतीही एक विचारसरणी त्यांना दीर्घकाळ बांधून ठेवू शकली नाही. द्वा. भ. कर्णिक यांच्यानंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादकपद त्यांच्याकडे आले. पुढील पंचवीसहून अधिक वर्षे त्यांनी मोठय़ा दिमाखाने हे पद भूषवले. त्यांचे
अग्रलेख विशेष गाजले. खेरीज, इंग्रजी साहित्य, सत्तांतराचा इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध याबाबतचे त्यांचे लिखाण मराठी वाचकांच्या अनेक पिढय़ांना समफद्ध करणारे ठरले.
अफाट इंग्रजी वाचन, मोजके बोलणे, समाजात फारसे न मिसळणे इत्यादी त्यांच्या वैशिष्टय़ामुळे त्यांच्या नावाभोवती कायमच एक वलय व दबदबा असे. मात्र राज्य तसेच दिल्लीतील अनेक काँग्रेसी नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. वसंतदादा पाटील यांच्याविरुध्द बंड करून पुलोदची स्थापना करताना तळवलकरांचा अग्रलेख कसा महत्त्वाचा ठरला याची आठवण शरद पवार अलिकडे सांगत असतात. अशा अनेक राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे लिखाण वा त्यांच्या दैनिकातील पत्रकारिता ही महत्त्वपूर्ण ठरली.
इंग्रजीतील हिंदू, फ्रंटलाईन, टेलिग्राफ इत्यादी नामांकित वफत्तपत्रात त्यांचे लेखन नित्य प्रसिध्द होत असे. त्यामुळे देशभरातील अभ्यासकांच्या वर्तुळात त्यांना मोठा मान होता. अखेरच्या काळात बराच काळ त्यांनी परदेशात वास्तव्याला होते. तरीही प्रामुख्याने मराठीमध्येच लिहिण्याचा नेम त्यांनी कायम ठेवला.
नेहरू ते नौरोजी, टिळक चरित्र, अग्रलेख, भारत आणि जग, पुष्पांजली, बदलता युरोप, वाचता वाचता इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिध्द आहेत. सत्तांतर व फाळणी तसेच सोव्हिएत साम्राज्याचा उदयास्त याविषयी तर त्यांनी परदेशातील संदर्भ अभ्यासून सखोल लिखाण केले. विशेष म्हणजे अगदी अखेरपर्यंत त्यांचे लिखाण चालू होते. इंग्रजी लेखकांच्या संदर्भातील त्यांचे एक पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.